राज्यात गेल्या काही दिवसात सरकारवर झालेल्या गंभीर आरोपांनंतरही मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीयेत, तसेच कारवाईदेखील करत नाहीयेत, त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून यासंदर्भात अहवाल मागावावा अशी मागणी भाजपने केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. गृहमंत्र्यांवर खंडणीखोरीचे आरोप झाले आहेत. तर पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे असतानाही त्याच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली आहे याचा अहवाल राज्यपालांनी मागवावा अशी मागणीही केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत छोटा माणूस - फडणवीस
रश्मी शुक्ला यांनी गुप्त माहिती लिक केली असा आरोप सत्ताधारी करतात. पण त्यांच्या तपासात जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत हा छोटा माणूस आहे, यावर मुख्यमंत्री स्वत: का बोलत नाहीत, असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.
काँग्रेसला किती खंडणी मिळते? – फडणवीस
एवढे गंभीर आरोप होऊनही सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने मौन का बाळगले आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. काँग्रेसला किती खंडणी मिळते, असा टोमणाही त्यांनी लगावला आहे.