इम्रान खान यांना 'बडे भाई' म्हटल्याने नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर टीकेची झोड ; भाजप नेते म्हणाले ही चिंतेची बाब

Update: 2021-11-20 13:31 GMT

चंदीगड : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांचे शनिवारी पाकिस्तानातील कर्तारपूरला येथे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे भावूक झालेले नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना 'बडे भाई' अशी उपमा दिली. त्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर चौफेर टीका होत आहे. अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. जनरल बाजवा आणि इम्रान खान हे दोघेही नवज्योत सिंह सिद्धू यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याची टीका त्यांच्यावर नेहमीच होत असते. मात्र , आता इम्रान खान यांना 'बडे भाई' म्हणून संबोधल्याने संपूर्ण देशवासियांसाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे.

दरम्यान , या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना नवज्योत सिंह सिद्धू म्हणाले की, हल्ली लोक कोणत्याही गोष्टीचा बाऊ करतात. भाजपला काय टीका करायची आहे, ती करू द्या. मी फक्त गुरुद्वाऱ्यात दर्शनासाठी गेलो होतो.

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये कर्तारपूर कॉरिडोअरच्या सीईओंसोबत चर्चा करताना हे वक्तव्य केले. पंजाबच्या इतर कॅबिनेट मंत्र्यांसोबत कर्तारपूर साहिब गुरुद्वाऱ्यात दर्शन घेण्यासाठी ते कर्तारपूरमध्ये गेले होते. तेथेही पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर आपले खूप प्रेम आहे, असे वक्तव्यही सिद्धू यांनी केले. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली.

दरम्यान या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, "काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानला जाऊन इम्रान खान किंवा पाकिस्तानची स्तुती करणार नाहीत, असे होऊ शकत नाही. इम्रान खान यांना 'बडे भाई' संबोधणे ही कोट्यवधी भारतीयांसाठी मोठी चिंतेची बाब आहे."

Tags:    

Similar News