'भिकारी करुन टाकलं' म्हणत भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याचा मंत्रीमंडळ बैठकीतच राजीनामा

भाजपच्या उत्तरखंड सरकारमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. हरकसिंह रावत यांनी मंत्रिमंडळाची बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर पडले त्यांनी बैठकीच्या दरम्यानच राजीनामाही दिला.;

Update: 2021-12-25 04:38 GMT

नवी दिल्ली// भाजपच्या उत्तरखंड सरकारमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. हरकसिंह रावत यांनी मंत्रिमंडळाची बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर पडले त्यांनी बैठकीच्या दरम्यानच राजीनामाही दिला. बैठकीतून बाहेर आल्यानंतर ते ढसाढसा रडले. गेल्या पाच वर्षापासून रावत हे स्वत:च्या क्षेत्रात एका मेडीकल कॉलेजची मागणी करत होते आणि ही मागणी पूर्ण झाली नाही. त्या पार्श्वभूमीवर हे राजकीय वादळ उठलेलं आहे.

रावत हे तसे पहिल्यापासून बंडखोर मानले जातात. मागील पाच वर्षापासून ते त्यांचं क्षेत्र असलेल्या कोटद्वारमध्ये एका मेडीकल कॉलेजची मागणी करत होते. मात्र, त्यांची मागणी काही पूर्ण झाली नाही. शेवटी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडला मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडली. शेवटी त्यांनी बैठकीतच राजीनामा दिला आणि बैठकीतून बाहेर पडले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. रावत यांनी यावेळी बोलताना 'ह्या लोकांनी भिकारी करुन टाकले' असं वक्तव्यही केल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे रावत हे कॅबिनेट मंत्री होते तरीही त्यांची मागणी पूर्ण होत नव्हती.

2016 साली त्यांनी काँग्रेसमध्ये असताना बंडखोरी केली. त्यावेळी हरीश रावत सरकारविरोधात त्यांनी बंड केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. दरम्यान हरकसिंह रावत यांनी आता भाजपमध्ये बंड केल्याने ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची चिन्ह आहेत. मात्र, याबाबत त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नसल्याचं दिसतंय. उत्तराखंड मध्ये पुढच्या काही काळात विधानसभा निवडणूका आहेत. भाजपानं तिथं काही महिन्याच्या अंतरानं तीन मुख्यमंत्री बदललेत. आता हरकसिंह रावत यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे उत्तरखंडमधलं राजकीय नाट्य संपताना दिसत नाहीय.

Tags:    

Similar News