महाराष्ट्राचे पहिले 'भारत श्री' विजेते विजू पेणकर यांचे 'खेळ' चरित्र तयार
महाराष्ट्राचे पहिले 'भारत श्री' विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध हॉकीपटू धनराज पिल्ले देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता हा प्रकाशन सोहळा माझगाव येथील सर एली कदुरी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांनी हे खेळचरित्र लिहिले असून सदामंगल पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
कबड्डीसोबतच १९७२ साली बॉडी बिल्डिंगमधील सर्वोच्च असा 'भारत श्री' किताबही विजू पेणकर यांनी पटकावला होता. त्यांच्या याच कामगिरीच्या जोरावर १९७२ साली बोर्नव्हिटाच्या जाहिरातीसाठी त्यांची निवड झाली होती. क्रिकेट सोडून अशा प्रकारे देशी खेळाडूला मिळालेली ही पहिलीच जाहिरात असावी. या पुस्तकामुळे १९७० च्या दशकातील कबड्डी आणि शरीरसौष्ठव खेळातील सुवर्ण क्षणांना उजाळा मिळाला आहे. तसेच या पुस्तकातील अनेक दुर्मिळ फोटो आणि सामन्यांच्या नोंदी क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरेल असा विश्वास विजू पेणकर यांनी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.