बिहार विधानसभेत अनपेक्षित निकाल? 'एनडीए' आघाडीवर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीला आघाडीवर असलेलं महागठबंधनला मागे टाकून भाजपप्रणित 'एनडीए'ने जोरदार पुनरागमन केले आहे. एवढेच नव्हे तर 'एनडीए'ने राजद-काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.;

Update: 2020-11-10 06:28 GMT

सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण 243 जागांपैकी 124 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन अवघ्या ९७  जागांवर पुढे आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे उमेदवार 71 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपपेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या संयुक्त जनता दलाचे (जदयू) उमेदवार 52 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप हा मोठा भाऊ होणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता 'एनडीए'ची सत्ता आल्यास नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन भाजप पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात 'राजद'ने मोठी आघाडी घेतली होती. महागठबंधनने जवळपास 113 जागांपर्यंत मुसंडी मारली होती. त्यामुळे महागठबंधन सहजपणे सत्ता स्थापन करेल, असे सांगितले जात होते. मात्र, अवघ्या काही तासांत हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. सध्याच्या घडीला राजद 59 तर काँग्रेस 20 आणि डावे पक्ष 19 जागांवर आघाडीवर आहेत.

चिराग पासवान किंगमेकर ठरणार का? सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, असे चित्र होते. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित 'एनडीए'ने जोरदार कमबॅक केल्याचे चित्र आहे. सध्या 'एनडीए'कडे बहुमताचा आकडा आहे. मात्र, नंतरच्या टप्प्यात ही आघाडी कमी झाल्यास लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Tags:    

Similar News