बिहार: देशात गेल्या काही दिवसांमध्ये पत्रकारांवर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच पत्रकारांवर होणारे हल्ले वाढले आहेत. जनतेच्या प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या पत्रकाराची बिहारमध्ये अत्यंत निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे.
बिहारमध्ये सुशासन राज्य करतं असा दावा केला जातो. मात्र, इथे पत्रकारच सुरक्षित नाहीत. राज्याच्या पूर्व चंपारणमध्ये तीन दिवसांपासून अपहरण करण्यात आलेल्या एका तरुण पत्रकाराचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत तलावात तरंगताना आढळला आहे. या संदर्भात जनज्वार ने वृत्त दिलं आहे.
पत्रकार मनीष कुमार सिंह दावत खाण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. मनीष हे एका टीव्ही चॅनेलचे स्थानिक रिपोर्टर होते. तसेच त्यांचे वडील संजय कुमार सिंह हे अरेराज दर्शन नावाच्या स्थानिक वृत्तपत्राचे संस्थापक संपादक आहेत. मृत पत्रकार मनीष सिंह यांचे वडील आरटीआय कार्यकर्ते म्हणून काम करतात. महेश यांनी अनेक प्रकरण उघड केल्यामुळे त्यांना नेहमीच धमक्या येत असतं. यासोबतच त्यांचा पट्टीदारांसोबत जमिनीचा वादही होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाडपूर पोलीस स्टेशन परिसरातील मनीष सिंह हे तीन दिवसांपूर्वी हरसिध्दी पोलीस स्टेशन परिसरात मठ लोहियार गावात एका पार्टीला उपस्थित राहण्यासाठी घराबाहेर पडले होते. तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद होता.
दरम्यान ते बेपत्ता झाल्यानंतर, त्यांची दुचाकी मठ लोहियार गावामध्ये संशयास्पद अवस्थेत सापडली. यानंतर, वडील संजयकुमार सिंह यांनी हरसिध्दी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींसह एकूण 12 जणांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणात एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दरम्यान मनीष बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही पत्रकारांची पोलीस कोठडीत चौकशी केली जात होती.
त्याच दरम्यान एक अज्ञात मृतदेह मठ लोहियार गावाच्या सरेह येथे मिळाल्याची माहिती मिळाली. मृतदेह पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. पोलिसांनी मृत पत्रकाराच्या वडिलांना घटनास्थळी मृतदेहाची ओळख करण्यासाठी बोलावले असता, त्यांच्या वडिलांनी शूजवरून हा मृतदेह मुलाचा असल्याचं सांगितलं. बराच वेळ पाण्यात बुडल्याने शरीरावर सूज आल्यामुळे ओळखणे कठीण होते.
दरम्यान पत्रकार मनीष यांची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. नातेवाईकांचे म्हणणे आहे की, मृताच्या चेहऱ्यावर काळा डाग तयार झाला आहे आणि एक डोळा काढला गेला आहे. तर दुसरीकडे, एकुलत्या एका मुलाचा मृतदेह पाहून त्यांच्या आईने हंबरडा फोडला. दरम्यान, पोलिसांनी पत्रकार मनीषचे वडील संजय सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एफआयआर नोंदवला आहे. आणि इतर आरोपींच्या अटकेसाठी छापे सुरू केले आहे. तसेच मृत पत्रकाराचे वडील संजय सिंह यांनी सांगितले की, बातमीद्वारे प्रकरण उघड केल्यामुळे मुलाची हत्या करण्यात आली आहे. त्याचबरोबर पट्टीदारांसोबत जमिनीचा वाद सुद्धा सुरू आहे. या कारणांमुळे सुद्धा हत्या झाली असल्याचं संजय सिंह यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, अरेराजचे डीएसपी संतोष कुमार यांनी सांगितले की, आरोपींना लवकरच अटक केली जाईल आणि त्वरित शिक्षा दिली जाईल. दुसरीकडे, अपवा या पत्रकार संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला असून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. अपवाचे प्रदेशाध्यक्ष विनोद पांडे यांनी जर पत्रकारांची अशीच हत्या होत राहिली तर संघटनेला आंदोलन करावं लागेल. तसेच संघटनेने स्थानिक प्रशासनाकडे दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
दुसरीकडे, इंडियन वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध केला असून बिहारमध्ये पत्रकारांवर वाढत्या पोलिस, प्रशासकीय आणि गुन्हेगारी हल्ल्यांमुळे पत्रकार समाज घाबरला आहे.
पत्रकार मनीष यांच्या हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध करत वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सहसचिव एस एन श्याम यांनी मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. या हत्याकांडाबाबत त्यांनी बिहारच्या राज्यपालांना सुद्धा भेटण्यासाठी वेळ मागितला असल्याचं त्यांनी सांगितलं.