BHR घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याच्या अटकेनंतर अनेक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. सुनील झंवरकडून पोलिसांना मिळालेल्या हार्डडिस्क आणि डायरीमध्ये भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोट्यवधी रुपये दिल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
BHR मल्टिस्टेट पतसंस्थेच्या अकराशे कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याच्या अटकेनंतर अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या सुनील झंवरकडून पोलिसांना मिळालेल्या हार्डडिस्क आणि डायरीमध्ये भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोट्यवधी रुपये दिल्याचा उल्लेख आहे. झंवर आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी तसेच सरकारी वकीलांनी पुणे न्यायालयात दिली आहे. याप्रकरणी गिरीश महाजन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
"BHR घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले सुनील झंवर हे माझेच नाही तर सर्वच राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांना अटक झाली आहे आणि पोलिस तपास करत आहेत. कायद्याप्रमाणे जे होईल ते होईल.", अशी प्रतिक्रीया गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिली.
BHR घोट्ळ्यातील काही महत्वाच्या बाबी
मुख्य संशयित सुनील झंवर याला पुणे न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आता सुनील झंवर पोलिसांना चौकशीमध्ये आणखी कोणकोणती माहिती देणार, कोणते खुलासे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नऊ महिन्यांपूर्वी पुणे आर्थिक शाखेच्या पथकाने सुनील झंवर यांच्या कार्यालयात छापा टाकून अनेक महत्वपूर्ण कागदपत्रं, सरकारी शिक्के, आमदार तसेच मंत्र्यांचे लेटरपॅड जप्त केले होते. त्यात एक डायरी आणि हार्डडिस्क सापडली होती .या डायरीत कोट्यवधी रुपयांची देवाण घेवाण झाल्याचा उल्लेख आहे. डायरीच्या एका कागदावर आमदार मंगेश चव्हाण यांना १ कोटी ५५लाख रुपये तर दुसऱ्या नोंदीत ४ कोटी ५० लाख दिल्याची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे डायरीच्या आणखी काही पानांवर अनेक बड्या राजकीय नेत्यांना पैसे दिल्याच्या नोंदी आहेत. ते पैसे कुठून आले, कसे आले आणि कोणाला दिलेत याचा तपास आता पुणे आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याचे सांगितले जाते आहे.गेल्या काही दिवसांपासून पुणे आर्थिक गुन्हे शाखेने नेमका काय तपास केला याची माहितीही आमदार चव्हाण यांनी मागितली होती, आवश्यक ती माहिती पोलिसांनीही दिली, मात्र गोपनीय माहिती वगळता इतर माहिती चव्हाण यांना पोलिसांनी दिली आहे.