आग्या मोहळाच्या मधमाशांचा हल्ला :चाळीस अभ्यासक जखमी

Update: 2022-03-28 10:39 GMT

शिवाजी महाविद्यालयात आयोजित मूर्ती व शिल्प संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला आलेल्या अभ्यासकांवर आग्या मोहळाच्या मधमाशांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात चाळीस अभ्यासक जखमी झाले. यातील दहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. उपचारानंतर सर्व जण घरी परत गेल्याची माहिती शिवाजी महाविद्यालयाचे अध्यक्ष मानसिंग पवार यांनी दिली.


शिवाजी महाविद्यालयात मूर्ती व शिल्प परिषदेचे दोन दिवसीय (दि. २६ व २७ मार्च) राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, कल्याण आदी शहरातून लेणी संशोधक सहभागी झाले होते. या संशोधकांचा अभ्यास दौरा आशिया खंडातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा येथे आयोजित करण्यात आला होता. हे अभ्यासक पितळखोरा लेणीची पाहणी करीत असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.





 


अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संशोधक सैरावैरा धावत सुटले. परंतु दुर्गम भाग व जंगलामुळे त्यांना सुरक्षित जागा मिळाली नाही. पोहता येणाऱ्या काहींनी दरीतील पाण्याच्या कुंडात उड्या मारल्या. बचाव केलेल्या काही संशोधकांनी कसातरी प्राचार्य विजय भोसले यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रतिभा अहिरे, राजानंद सुरडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. परदेशी व राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सीताराम जाधव, डॉ. मुकुंद सोमवंशी, डॉ. सदाशिव पाटील, सचिन गिरी, राज ठाकूर, डॉ. प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला. मात्र, ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका मिळण्यास अडचणी आल्या. डॉ. सीताराम जाधव, प्राचार्य विजय भोसले, प्रा. प्रतिभा अहिरे, डॉ. प्रकाश खेत्री, डॉ. मुकुंद सोमवंशी, राजानंद सुरडकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

हे झाले जखमी

या लेणीत आग्या मोहळाचे अनेक पोळे आहेत. मधमाशांनी चढवलेल्या हल्ल्यात लेणी अभ्यासक प्रा. डॉ. संजय पाईकराव, संदेश कांबळे, सुधाचंद्र जैन, सलीम खान, शैलेश सावे, अतुल भोसीकर, संजय हवालदार, अस्मिता हवालदार (रा.मध्यप्रदेश), जगदीश गोपाल असोदे, माधुरी जगदीश आसोदे (रा.कर्नाटक), नीता नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच माया माशाळकर, प्रा.धम्मपाल माशाळकर (रा. सोलापूर), प्रा.अरविंद आचार्य (रा.हैदराबाद), संजिवनी मादळे (रा.औरंगाबाद), रिझवान देशमुख, वसुधा देशमुख (रा. कल्याण), थोरवत श्रीहरी (रा.नाशिक), सूरज रतन जगताप (मुंबई), रितेश वाघे, अक्षर कापसे, पृथ्वीराज धवड (सर्व रा.नागपूर), प्रा.माधुरी चौगुले, पुरातत्व विभागाचे रक्षक देविदास राठोड (रा.आंबा तांडा), डॉ. किरण प्रकाश काळे (रा. सोलापूर), नीता ओमप्रकाश नायक (रा. गोवा), वसुधा देशमुख (रा.डोंबिवली), डॉ. विजय कुमार भोजे (रा.उस्मानाबाद), डॉ. अनिता शिंदे (रा. बीड), हर्ष विजय जावळे, डॉ. प्रकाश महाजन,अमोल कांबळे (रा. सोलापूर), बालाजी सिरसाठ (रा. सोलापूर), प्रा.जगदीश भेलोंडे, प्रा. कारभारी भानुसे, अरुण थोरात, (रा.कळंकी), स्वप्नील मगरे, सचिन खरात, सागल गायकवाड, डॉ.अनिता शिंदे आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.

तब्बल तीन तास अत्यवस्थ अवस्थेत दरीत पडून होते….

यापैकी शैलेश सावे हे तब्बल तीन तास अत्यवस्थ अवस्थेत दरीत पडून होते. अधिक वजन असल्याने त्यांना दरीतून वर काढणे अवघड झाले. त्यासाठी प्रा.कारभारी भानुसे, साईनाथ विष्णू काळे, केशव आघान, विजय चॉंदसिंग चव्हाण, सोमनाथ चव्हाण यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, शेकडो मधमाशा जखमी सावे यांच्या भोवती घोंगावत होत्या. त्यांच्या आंगावर कपडे टाकून मदतनीस परतले. अखेर डॉ. सीताराम यांनी स्थानिक आदिवासींची मदत मागितली. यशोधावजी आघान (रा.ठाकरवाडी), सोमनाथ रंगनाथ उघडे (रा.अंबाला), हरीदास गावंडे, केशव आघान, साईनाथ काळे यांनी टेंभा पेटवून रेस्क्यू करून त्यांना वर आणले. तरीही मधमाशांनी वरपर्यंत त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. सावे यांच्यावर घटनास्थळीच डॉ. सीताराम जाधव यांनी उपचार केल्याने अनर्थ टळला.




 


जखमींना कन्नड ग्रामीण रुग्णालयात विशेष बेडसची सोय करण्यात आली आहे. डॉ. मनिषा गिते,डॉ. ऋतुजा थोरात, परिचारीका विजया साळवे, संध्या गवळी, पी.डी.राठोड, मधुकर मतसागर, जाधव नर्सिंग होममध्ये डॉ. सीताराम जाधव, डॉ. रिझवान देशमुख, डॉ. सदाशिव पाटील, आकाश पवार आदींनी उपचार केले. ग्रामीण रुग्णालयात आमदार उदयसिंग राजपूत, शिवाजी महाविद्यालयाचे अध्यक्ष मानसिंग पवार यांनी जखमींना धीर दिला

Tags:    

Similar News