आज 1 मेपासून देशात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर बीडसह परळी, गेवराई लसीकरण केंद्रावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादामध्ये नागरिकांनी लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करू नये अस आवाहन केलं होतं. मात्र, असे असताना देखील बीड, गेवराई परळीत प्रचंड गर्दी करण्यात आली आहे. दरम्यान परळी शहरातील लसीकरण केंद्राला 300 लस मिळाल्या आहेत. यामध्ये केवळ लसीचा दुसरा डोस देण्यात येतोय.
त्यामुळे नव्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड झालाय. एकंदरीतच ही गर्दी पाहून लसीकरण केंद्र कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.