कोर्टावरील टीका संजय राऊत यांच्या अंगलट? अवमानप्रकरणी कोर्टात जनहित याचिका

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. त्यातच दररोजच्या पत्रकार परिषदांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच संजय राऊत यांनी कोर्टावर केलेली टीका त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Sanjay raut in trouble);

Update: 2022-04-20 06:02 GMT

दररोज सकाळी होणाऱ्या आरोप प्रत्यारोपामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर संजय राऊत यांनी कोर्टाच्या निर्णयावर टीका केली होती. त्याविरोधात बार काऊंन्सीलने संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे कोर्टावर केलेली टीका संजय राऊत यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (sanjay raut Criticize to court)

इंडियन बार असोसिएशनने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. संजय राऊत यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारे आणि अवमानजनक आरोप केल्यामुळे जनहित याचिका दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही नाव प्रतिसादकर्ते म्हणून टाकले आहे. त्यामुळे हे प्रकरण संजय राऊत यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत? (Sanjay raut Criticize Court)

  • संजय राऊत यांनी INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर पैशांचा अपहार केल्याचा आरोप केला होता. त्याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांना दिलासा देण्यास नकार दिला. मात्र उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपुर्व जामीन मंजूर केला. त्यावरून संजय राऊत यांनी उच्च न्यायालयावर टीका केली होती. (INS Vikrant)
  • मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांना दिलासा दिल्यानंतर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, विशिष्ट विचारधारेच्या आणि विशिष्ट पक्षाच्या लोकांना एका रांगेत दिलासा कसा मिळतो? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच पत्रकारांशी बोलताना भाजपच्या लोकांना एका रांगेत दिलासा कसा मिळतो? यासाठी न्यायव्यवस्थेत काही विशिष्ट लोक बसवले आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला होता.
  • तसेच 15 एप्रिल रोजी किरीट सोमय्या यांना विक्रांत प्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी आणखी एक दिलासा घोटाळा असे ट्वीट केले होते. त्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, मी 100 टक्के सांगतो हा दिलासा घोटाळाच आहे.

  • पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, ज्या गोष्टी आम्ही पोलिस आणि प्रशासनाकडून करून घेऊ शकत नाही. त्या गोष्टी आम्ही न्यायालयाकडून करून घेतो. त्यामुळे न्यायालयात असलेलं वजन कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला काल परवा दिसले असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

सामनाच्या अग्रलेखातही संजय राऊत यांनी लिहीले होते की, मुंबै बँकेपासून, दिशा सालियन प्रकरण असो की विक्रांत सगळ्या एकाच पक्षाच्या लोकांनाच कसा दिलासा मिळतो? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता. तसेच न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का? न्यायालय कोणाच्या सूचनेवरून काम करत आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी विचारला होता. त्याबरोबरच हे असेच सुरू राहिले तर लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्यायव्यवस्था धोक्यात येण्याचा इशारा राऊत यांनी दिला होता. त्यावरून बार असोसिएशनने संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अवमान प्रकरणी संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News