बंडातात्या कराडकर अडचणीत, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंविरोधातील वादग्रस्त विधान भोवले
प्रसिध्द किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. त्यामुळे बंडातात्या कराडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.;
सुप्रसिध्द किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बंडातात्या कराडकर चांगलेच अडचणीत आले आहेत. तर महिला आयोगाने बंडातात्या कराडकर यांच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे.
किराणामाल आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला. या निर्णयाविरोधात व्यसनमुक्ती युवक संघाचे बंडातात्या कराडकर यांनी आंदोलन केले. यावेळी उपस्थितांशी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
बंडातात्या कराडकर यांनी म्हटले होते की, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात. तर त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा दिला आहे. तर राज्य महिला आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेत, महिलांबाबत अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, असे सांगत सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात कारवाई करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.