लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात- रश्मी ठाकरे

लतादिदींच्या निधनावर प्रतिक्रीया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे म्हणाल्या की, लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात झाला.;

Update: 2022-02-06 09:11 GMT

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांनी लतादिदींच्या जाण्याने बाळासाहेबांनंतर मोठा आघात झाला असल्याची भावना व्यक्त केली.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने बाळासाहेबांनंतर मोठा आघात झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी म्हटले की, लतादिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या. सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

बाळासाहेब असतांना आणि नंतर देखील लतादिदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गेल्या 28 दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्यानंतर शनिवारी दुपारी लता मंगेशकर यांची प्रकृती ढासळली. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी देशभरातील दिग्गजांनी ब्रीच कँडी रुग्णालयाकडे धाव घेतली. तर शनिवारी रात्री रश्मी ठाकरे यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात धाव घेतली होती. मात्र रविवारी सकाळी 8.12 मिनिटांनी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबत देशभरातून लता दिदींना श्रध्दांजली वाहण्यात आली.

दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.




 


अंत्यसंस्कार कोठे होणार

लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच आता ब्रीच कँडीतून लतादीदींचे पार्थिव त्यांच्या पेडररोडवरील घरी काही काळ ठेवलं जाणार आहे.

लतादिदींच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांची रीघ

लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अमिताभ बच्चन, रश्मी ठाकरे, संजय लीला भन्साळी, लता नार्वेकर, राज ठाकरे यांच्यासह दिग्गजांनी अंत्यदर्शनासाठी धाव घेतली. तर दोन दिवसाच्या राष्ट्रीय दुखवट्यात सर्व शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एका युगाचा अस्त झाल्याची भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली आहे.


Tags:    

Similar News