भारतीय जनता पक्षाचं सरकार जिथे आहे, तिथे छापेमारी झाल्याचे गेल्या सहा वर्षात दिसले नाही. ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जातोय असा आरोप महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
भाजपच्या ऑपरेशन कमळबाबत बोलताना थोरात म्हणाले की, भाजपचं ऑपरेशन कमळ यशस्वी होईल, असे वाटत नाही. ईडीच्या छापेमारीमुळे कोणावरही दबाव येणार नाही. उलट लोक पक्के होतील. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही एकत्र आहोत आणि अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करु. काहींना वाटत होतं हे सरकार फार काळ टिकणार नाही, सरकार पडेल. परंतु आमच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केलं आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल, असा दावा करणाऱ्या रावसाहेब दानवे यांनाही थोरात यांनी यावेळी टोला लगावला, थोरात म्हणाले की, दानवे जे काही बोलतायत, ते एक दिवास्वप्न आहे. त्यांनी ते दिवास्वपन पाहात राहावे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. आम्ही कायम यावर आक्षेप घेतला आहे.भारतीय जनता पक्षाचं सरकार जिथे आहे, तिथे छापेमारी झाल्याचे गेल्या सहा वर्षात दिसले नाही. ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जातोय हे दुर्दैवी आहे.