रेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना बाळासाहेबांचं नाव कुठे आणि किती ठिकाणी द्यायचं? असा सवाल सरकारला केला होता. मात्र, आज त्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 2 मिनिट 54 सेकंदाचा एक व्हिडीओ ट्विटर वर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस 1 मिनिट आणि 51 सेकंदाला असं म्हणतात की...
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा कधीही कुठंही विरोध नसतो. परंतू या सरकारने एकदा निर्णय करावा किती जागांना? किती ठिकाणी आपण बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जे गोरेवाडा प्राणी संग्रहालय आहे.
हे गोंडवनाचा भाग असल्यामुळे आणि तिथल्या गोंड समाजाची आदिवासी समाजाची मागणी असल्यामुळे या प्राणिसंग्रहालयाला गोंडवना नाव देण्याची मान्य करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते.
असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओतून शिवसेनेला चिमटे काढण्याची एकही संधी देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेली नाही. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेनेने ऐन वेळेला मुख्यमंत्री पदाचं समसमान वाटप व्हावं. यासाठी भाजपसोबतची युती तोडून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. त्याचं शल्य फडणविसांच्या या व्हिडीओतून दिसून येतंय. यातूनच फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील शिवसेनेला लागतील असे व्हिडीओ चे भाग आपल्या ट्विटर वर शेअर केले आहेत.