योगींच्या राज्यातील स्त्री सन्मान!

योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा मकरंद देसाई यांनी शेलक्या शब्दात घेतलेला समाचार...;

Update: 2021-01-07 05:39 GMT

योगीच्या धर्मराज्यात नव्या वर्षात एका महिलेचा जबरदस्त सन्मान केला गेला अशी बातमी आहे! हा सन्मान इतका हृदयद्रावक होता की ती बापडी पन्नास वर्षांची बाई तिथेच स्वर्गवासी झाली असे म्हणतात!! तर झालं असं की एक यूपीतल्या बदायु जिल्ह्यातल्या एका गावातली एक पन्नास वर्षांची बाई तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एका आश्रमवजा देवळात गेली. पोलिसांच्याकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार त्या आश्रमातील महंत आणि त्याचे शिष्य यांनी त्या बाईवर फारच जबरदस्त अनुग्रह केला!

तो अनुग्रह सहन न झाल्याने त्या बाईच्या काही बरगड्या मोडल्या असाव्यात आणि ती बाई खूप रक्तस्त्राव होऊन, आघात सहन करू न शकल्याने परमसमाधीला पोचली असावी असं पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्या बाईच्या फक्तच स्त्रियांनाच असतात अशा अवयवांमध्ये लोखंडी रॉड घुसवायचा विशेष अनुग्रहसुद्धा तिने देह सोडायच्या आधी करून झाला असल्याचे तिचा मृतदेह तपासताना कळले आहे.

काहीच महिन्यांपूर्वी हाथरसमध्ये एका एकोणीस वर्षांच्या मुलीचा असाच सन्मान केला गेला होता. तेव्हाही एक नव्हे तर अनेक पुरुषांनी तो नारीसन्मान करायला हातभार लावला होता! त्या आधी तर यूपीच्या नारंगी परकरवाल्या महान नेत्या पक्षाच्या आमदाराने एका बालिकेवरच आपला कृपाप्रसाद वर्षवला होता. पण या नव्या वर्षात योगीच्या धर्मराज्यातील पुरुष स्त्रीचा सन्मान करताना तिच्या वयाचा विचार करत नाहीत. हे स्पष्ट झाले आहे. फक्त तरुणींनाच सन्मानाचा लाभ मिळावा असा अन्याय युपीत अजिबात होत नाही हे या पन्नास वर्षांच्या बाईंना प्राप्त झालेल्या दिव्य अनुभूतीने स्पष्ट केले आहे... त्यामुळे यूपीमधल्या नारंगी परकर ब्रँड धर्मराज्यात राज्यात सर्वच वयोगटातील स्त्रियांना सन्मानित व्हायची रोजच संधी उपलब्ध असते असे म्हणायला हरकत नाही.

गंमतीचा भाग म्हणजे गेल्यावेळी उगाचच त्या सामूहिक सन्मानाने दिव्यगती प्राप्त झालेल्या एकोणीस वर्षांच्या मुलीच्या रक्ताचे डाग युपीच्या महान नेत्याच्या नारंगी परकरावर लागू नयेत म्हणून टोठले पोलिसांनी तिचे पार्थिव शरीर तिच्या नातेवाईकांना तसदी न देताच अग्नीच्या स्वाधीन केले होते. यावेळी ही पन्नास वर्षांची बाई मात्र तितका फास्टट्रॅक अग्निसंस्कार मिळवू शकली नाही. हा थोडा चिंतेचा विषय बनला असल्याचे नारंगी परकर परिवाराच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे.

असो! योगीचे धर्मराज्य असेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा!! जय श्रीराम

Tags:    

Similar News