बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

Update: 2024-02-13 01:24 GMT

डॉ. अशोक बेलखोडे

आदरणीय बाबा आमटे यांचे कार्य, त्यांचे जीवन हे देशाच्या एकात्मतेसाठी, विकासासाठी, देश शक्तीशाली बनण्यासाठी आजही प्रेरणादायी ठरत असुन युवा पिढीने ही प्रेरणा घेऊन समाजकार्य व देशकार्य करावे असे सांगत बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कारार्थीचे अभिनंदन करीत कलकत्ता येथील जेष्ठ चार्टट अकाऊंटंट, भारत जोडो सायकल यात्रेचे समन्वयक तथा भारत पाक मैत्रीचे अभ्यासक श्री. ओ. पी. शाह यांनी गौरवोद्वार काढले.

 

बाबा आमटे एकता अभियानाच्या वतीने बाबांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन दि. १०.०२.२०२४ रोजी आनंदवनात ता. वरोरा जि. चंद्रपूर येथे मुख्यमंत्री सभागृहात आयोजिलेल्या बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्काराच्या प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्याथ्यर्थ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

या वर्षी (२०२४) बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी तामिळनाडू, मदुराई येथील श्री. आर. सुंदरेसन (वय ८३ वर्ष) हे ठरले आहेत श्री. सुंदरेसन यांनी लहानपणापासुन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विशेष करून अन्न सुरक्षेसाठी, राष्ट्रीय एकात्मता व आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण इत्यादी क्षेत्रात अतुलनीय अशी कामगीरी केली आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले आहे. आदरणीय बाबा आमटे यांनी राष्ट्रीय एकात्मता व सद्भावना यासाठी काढलेल्या कन्याकुमारी ते काश्मिर (१९८५-८६) व इटानगर ते ओखा (१९८८-८९) या दोन्ही सायकल यात्रेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून अत्यंत मोलाची कामगिरी दोन्ही यात्रा यशस्वी करण्यात बजावली आहेत. १ लाख रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

 

बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असुन यासाठी मध्यप्रदेश जबलपूर परिसरातील बरगी धरणामुळे झालेल्या विस्थापितांचे पुर्नवसनासाठी मागील ३५ वर्षापासून संघर्ष व रचनात्मक कार्य करणारे कार्यकर्ते श्री. राजकुमार सिन्हा हे मानकरी ठरले आहे. भारत जोडो अभियान १९८९ अरूणाचल ते गुजरात या सायकल यात्रेत त्यांनी पूर्णवेळ म्हणजे ६ हजार कि.मी.

सहभागी होऊन प्रवास केला या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते.

बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टचे अध्यक्ष तथा महारोगी सेवा समितीचे कार्यकारी विश्वस्त डॉ. विकास आमटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात भारत जोडो सायकल अभियानाचे राष्ट्रीय समन्ययक (पुर्वांचल विभाग) श्री. ओ. पी. शाह यांच्या हस्ते श्री. सुंदरेसन यांना तर नागपूरचे प्रसिध्द मेंदूविकार तज्ञ व जागतिक मेंदूविकार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या हस्ते श्री. राजकुमार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मंचावर प्रमुख पाहूणे व सत्कारमुर्ती समवेत ट्रस्टचे उपाध्यक्ष, प्रा. डॉ. सोमनाथ रोडे य ट्रस्टचे सचिव डॉ. अशोक बेलखोडे, उपस्थित होते.

 

सत्काराला उत्तर देतांना श्री. सुंदरेसन यांनी अभियानातील आठवणी सांगत बाबांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे आतापर्यंत केलेल्या कार्याचा गौरव झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच राजकुमार यांनी त्यांनी स्विकारलेल्या संघर्षमय सामाजिक कार्यास बाबांच्या नावाच्या पुरस्कारामुळे नैतिक बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.

या प्रंसगी नुकतेच पद्मश्री सन्मानासाठी नाव जाहीर झालेले डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा बाबा आमटे एकता अभियान व आनंदवन परिवाराच्या वतीने डॉ. विजय पोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ रोडे, सुत्रसंचलन श्री. अतुल शर्मा तर डॉ. अशोक बेलखोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास देशभरातील भारत जोडो सायकल यात्री, आनंदवनातील कार्यकर्ते, नागरीक, पत्रकार व मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. आनंदवनातील मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही त्यांच्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून आनंद घेतला हे विशेष सत्कार समारंभापूर्वी प्रमुख पाहूणे व भारत जोडो यात्री यांनी बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहीली व परिसरात वृक्षारोपण केले.

डॉ. अशोक बेलखोडे

सचिव

Tags:    

Similar News