औरंगाबाद : रिक्षातून प्रवास करणाऱ्यांना पहिल्या किलोमीटरसाठी सहा रुपये तर दुसऱ्या किलोमीटरला तीन रुपयांनी प्रवास महागण्याची शक्यता आहे. अशी दरवाढ झाल्यास शेअर रिक्षांचे दरही वाढू शकतात. पेट्रोल ६० ते ८० रुपये प्रतिलिटर असताना मीटर रिक्षाचालक पहिल्या किलोमीटरला १४ आणि दुसऱ्या किलोमीटरलाही १४ रुपये आकारत होते. आता पेट्रोल ११० रुपये झाल्याने भाडेवाढ करावी, अशी मागणी त्यांनी रस्ते वाहतूक प्राधिकरण केली होती. यासंदर्भात सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सहायक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांच्यासह रिक्षा संघटनांचे निसार अहमद, एस. के. खलील, रमाकांत जोशी, कैलास शिंदे, शिव वाहतूक शाखेचे फारुख भाई जाकिर पठाण मोसिन शेख व शेख लतीफ, सरवर खान आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे रिक्षाचालक संकटात आहेत. त्यात इंधन महागाईचा मारा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर पहिल्या किलोमीटरला २० आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला १७ रुपये अशा भाडेवाढीवर सकारात्मक विचार करण्याचे मैत्रेवार यांनीसांगितले. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, रिक्षा संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आरटीओ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली आरटीए समिती याविषयी अंतिम निर्णय घेणार आहे.