'त्या' डॉक्टरला बडतर्फ केले: अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरनं कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकरणावरुन आज विधानसभेत पडसाद पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्याची घोषणा कोविड सेंटर मध्ये महिला सुरक्षेसाठी एसओपी निश्चित करण्यात येईल असे सांगितले.;
विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी ोबी सेंटरमधील भ्रष्टाचाराबाबत विधिमंडळाच्या पायर्यांवर जोरदार निदर्शने केली होती. विधानसभेचे कामकाज सुरू होताच आमदार मनीषा चौधरी यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा येथे उपस्थित केला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मागील अधिवेशनापासून कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेबाबत मुद्दे उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना चार पत्रे लिहिली याचे स्मरण करून दिले.
विरोधकांचा गदारोळ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. ते म्हणाले,औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झालेला नाही. संबंधित डॉक्टर आणि त्या महिलेचे पती मित्र होते. याबाबत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. संबंधित महिलेने नाव उघड करण्यास नकार दिला आहे. कोविड सेंटर मध्ये SOP निश्चित करण्यात येईल असे पवार यांनी यावेळी सांगितले.
पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली. तिच्यावर उपचार सुरू असतानाच एक आयुष डॉक्टरने मंगळवारी रात्री दोन वाजता या महिलेकडून शरीर सुखाची मागणी केली. एवढच नाही तर तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध करत आरडाओरड केली. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. पीडित महिलेची सुटका केली.
या प्रकारानंतर रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली होती. आज विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईची घोषणा केल्यानंतर विरोधक शांत झाले.