मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे.
परमबीर सिंह यांच्या या लेटर बॉम्ब ने वाझे प्रकरणात कात्रीत सापडलेल्या ठाकरे सरकारवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले…
परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुखांनी सचिन वाझेला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले होते. हे सांगणं म्हणजे महाराष्ट्रातला मोठा राजकीय भूकंप आहे. परमवीर सिंह यांनी आता हे ही सांगून टाकावं. अनिल देशमुखांना हे कोणी सांगितलं. ज्यांनी सचिन वाझेला मुंबई सेवेत परत आणलं त्यांनी की, ज्यांनी सचिन वाझे लादेन आहे का? असं म्हणून त्याला वाचवलं. त्याला कोणी असे आदेश दिले होते का? परमबीर सिंह यांना अटक करा. अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर देखील तातडीने कारवाई करावी. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आज रात्री टीव्हीवर येऊन जनतेसमोर खुलासा करण्याची आवश्यता आहे. किंवा मुख्यमंत्री सुद्धा यात सामील आहेत की काय? अशा प्रकारची शंका लोकांच्या मनात निर्माण होईल. असं आमदार अतुल भातकळकर यांनी म्हटलं आहे.
काय आहे पत्र?
सचिन वाझे प्रकरणात राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिस आयुक्त पदी असणाऱ्या परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या बदल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात अनेक थक्क करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग (Prambir Singh) यांना हटवण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं असून या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ८ पानी पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान परमबीर सिंग यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे..
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असतानापरमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी केली आहे.
सचिन वाझे प्रकरण नक्की काय आहे?
25 फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती.
त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी एटीएसकडे देण्यात आली. मात्र, अंबानीच्या घराबाहेरील स्फोटकांच्या चौकशीचे प्रकरण एटीएसकडे असताना एनआयएने हे प्रकरण स्वत:कडे घेतले. त्यानंतर त्यांनी सचिन वाझेची चौकशी केली. या चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली. वाझे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने वाझे यांना 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वाझेंना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर चौकशी दरम्यान वाझे यांनी मोठे खुलासे केले असल्याचं एनआयए ने म्हटलं आहे.