दारुअड्डा उद्ध्वस्त करायला गेलेल्या पथकावर हल्ला, महिला पोलिस गंभीर जखमी
परिवर्तनाच्या वाटेवर असणाऱ्या सोलापूरात अजुनही देशी दारूची अवैध निर्मिती करण्यात येते. सोलापुरातील मुळेगाव तांडा विभागातील जमावाने हातभट्टी दारू अड्डयावर कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांवर विरोध करत हल्ला केला. या हल्ल्यामध्य़े राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत.
सोलापुरात एकीकडे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची अवैध दारू विरोधी 'ऑपरेशन परिवर्तन' गाजत असताना जिल्ह्यात दुसरीकडे छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अवैध हातभट्टी अड्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदाफाश केला आहे. या कारवाईरम्यान जमावाने पथकार हल्ला केला. यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला पोलीस प्रियंका कुटे या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर मध्ये उपचार सुरु आहेत.
या कारवाईमध्ये एकूण १४८० लिटर हातभट्टी नष्ट करण्यात आली असून ३२ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मूख्य हल्लेखोर फरार आहे. या सर्व आरोपींवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा भारतीय दंड संहिता कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.