रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला ; रुपाली चाकणकरांकडून कारवाईची मागणी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Update: 2021-12-28 01:41 GMT

मुक्ताईनगर // मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संघर्ष पेटला असून त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

रोहिणी खडसे या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे एका विवाहाच्या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम आटोपून त्या आपल्या फॉर्च्युनर गाडीने घरी परतत असताना अचानक काही इसमांनी हल्ला केला. अचानक झालेल्या दगडफेकीनंतर एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच खडसे समर्थकांनी त्यांच्या घराजवळ एकच गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून तीव्र निषेध केला आहे.

'एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी' अशी मागणी चाकणकर यांनी ट्विट करत केली आहे.

Tags:    

Similar News