विधिमंडळातील शोक प्रस्तावाच्या चर्चेत सरदार तारासिंग यांच्या चॉकलेटची चर्चा

Update: 2020-12-14 09:25 GMT

विधिमंडळाच्या शोकप्रस्तावाच्या चर्चेच्या निमित्ताने दिवंगत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार सरदार तारासिंह आणि भारत भालके यांच्या आठवणीने सदस्य गहीवरले. आमदार तारासिंग यांच्या चॉकलेटची आठवण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढली. वित्तमंत्री अजित पवार यांनी सरदार तारासिंग फक्त विरोधकांना चॉकलेट देत नव्हते तर आम्ही मंत्री असताना आम्हालाही चॉकलेट आणून द्यायचे अशी आठवण सांगितली.

राजकारणात युती आघाडी तुटते. शिवसेना भाजपमधील युती तुटली आणि आता आघाडी सुरू झालेली आहे. शिवसेना भाजपच्या युतीमध्ये काही सहप्रवासी होते, त्यापैकक म्हणजे सरदार तारासिंह होते. शिवसेना आणि भाजपमधील युती तुटल्यानंतरही मोजके लोक मातोश्रीवर येत त्यापैकी एक तारासिंह होते. राजनिती अपनी जगह, अपना रिश्ता कायम रहेगा असे म्हणत सरदार तारासिंह यांचा मातोश्रीसोबतचा संबंध होता. तारासिंह कधी घरी यायचे कधी फोन करायचे. विशेषतः निवडणूका आल्या की ते मातोश्रीवर येऊन भेट घ्यायचेच. आपल्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून पुढची कारकीर्द सुरू केली होती. सरदार तारासिंह यांच्यावर विधानसभेतल्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या तारासिंह यांच्यासोबतच्या आठवणी ताज्या केल्या.

१० ऑगस्ट १९३७ पंजाबच्या हरिपूर येथे त्यांचा जन्म झाला होता. आपले मॅट्रिक शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. अतिशय लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. मुंबई महापालिका नगरसेवक ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. लोकांनी अतिशय भरभरून प्रेम केलेला आमदार म्हणून काम करताना त्यांनी प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तीमत्व म्हणून काम केले. आदर्श नगरसेवक म्हणून पुरस्कार राज्यपालांनी दिला होता. मुलुंड मतदारसंघातून ते १९९९ पासून सातत्याने निवडून आले होते. चुकीच्या प्रथांवर परखड भाष्य करण्याचा त्यांचा स्वभाव होता अशीही आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

तारासिंह यांना सभागृहात गोपिनाथ मुंडे साहेब नेहमी चॉकलेट मागायचे. मुंडे साहेब जेव्हा जेव्हा सभागृहात नियमाच्या पुस्तकाचा उल्लेख करायचे तेव्हा ते नियमाचे पुस्तक हे तारासिंह यांच्याकडून मागायचे. पुर्णवेळ सभागृहात बसून ते प्रत्येक विषयात सहभागी व्हायचे. सभागृहातील प्रत्येक प्रश्नात मुलुंड टाकणे ही त्यांची खासीयत होती. अतिशय मनोभावे, प्रामाणिकपणे, मनोभावे त्यांनी काम केले. नांदेडच्या मंदिरावर विश्वस्त असताना अनेक नवीन गोष्टी भाविकांसाठी तयार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचा स्वभाव संघर्षाचा होता, ते कधीच कधी घाबरले नाहीत.

नांदेडमध्ये त्यांना सुरूवातीला विरोध केला गेला, पण त्यांनी चुकीच्या प्रथा बदलल्या. सर्व पक्षातले त्यांचे चांगले संबंध होते, त्यांचे कुणाचेही वैर नव्हते. पण त्यांनी सगळ्या पक्षाशी संबंध हे कायम ठेवले. ते सभागृहात कधीही बोलायला तयार व्हायचे पण त्यांना समोरच्या बाकाचे सदस्य बोलू द्यायचे इतके ते लोकप्रिय होते. रोज अनेक किलोमीटर पायी चालून संपर्क ठेवायचे. त्यानंतर रस्त्यावरच चहा नाष्टा करायचे आणि त्याच ठिकाणी लोकांना जमवून प्रश्न सोडवायचे, असा लोकांमधील नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. पूर्व द्रुतगती मार्गावर अनेक गोष्टी करून अपघात कमी करण्यासाठी त्यांचे योगदान होते. शेवटच्या क्षणापर्यंत सामान्याचा विचार करणारा नेता म्हणून ते प्रसिद्ध होते. १९९९ पासून सातत्याने निवडणूक लढवून जिंकून येणारा भाजपमधील आमदार म्हणून मुलुंड मतदारसंघातला अतिशय लोकप्रिय असा नेता म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. २०१९ च्या निवडणूकीत ते घरी जरी बसले असते तरी निवडून आले असते, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी सरदार तारासिंह यांच्याबाबतची आठवण सांगितली.

वित्तमंत्री अजित पवार यांनी सरदार तारासिंग यांच्या आठवणी सांगताना त्यांच्या मुलुंडमधील कार्याचा गौरव केला. कल्याण चॉकलेट केवळ विरोधकांना देत नव्हते तर सत्ताधारी पक्षातील सदस्य आणि मंत्र्यांनाही आणून द्यायचे आता आठवण अजित पवारांनी सांगितली. भाजपमध्ये वयाच्या ७५ नंतर निवडणुक लढवायची नाही असा नियम आहे, तो नियम त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत पाळला. पक्षाच्या कार्यकर्त्याला निवडून द्यायची जबाबदारी माझी असेही सरदार तारासिंह यांनी सांगितले होते.

दिवगंत आमदारांमध्ये भारत भालके, माजी मंत्री विष्णु सावरा, जावेद इक्बाल खान, विनायकराव पुंडलिकराव पाटील, माजी राज्यमंत्री तारासिंह सरदार, अनंतराव देवसरकर, नरसिंगराव घारफळकर, नारायण पाटील, किसनराव खोपडे, सुरेश गोरे, डॉ जगन्नाथ ढोणे या विधानसभा सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभेत आज शोक प्रस्ताव मांडण्यात आला. या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अनेक विधानसभा सदस्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. दिवंगत सदस्यांच्या शोकप्रस्तावाच्या निमित्ताने सर्व सदस्य भावुक झाले होते.

Tags:    

Similar News