आपल्या देशात प्रश्न विचारणे हा गुन्हा ठरतो...असं का म्हणाले आदित्य ठाकरे?

Update: 2021-12-25 12:37 GMT

पुणे - केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अनेकदा शिवसेनेकडून केला जातो. याच पार्श्वभुमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या देशात प्रश्न विचारणे हा गुन्हा ठरतो, असा टोला लगावला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपण या संस्थेच्या माध्यमातून देशाला नवी दिशा देण्याचे काम करत आहोत. कारण पुढच्या पिढ्या घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. तर अनेकदा मुले पालकांचे ऐकत नाहीत. मात्र शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकतात. त्यामुळे मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांची भुमिका महत्वाची असते.

आदित्य ठाकरे म्हणाले, "माझ्या घरी राजकीय वातावरण असले तरी मी स्टेजवर उभा राहण्यास खूप घाबरायचो. पण शिक्षकांनी नेमकं काय, कुठे, कधी आणि किती बोलावे याचे धडे दिले. त्यामुळे मी स्टेजवर उभा असण्याचे श्रेय शाळेचे प्राचार्य डॉ. बीपीन प्रसाद यांना देतो. त्यांच्यामुळेच मी स्टेजवर उभा राहून बोलू शकतो. याबरोबरच जीवन जगण्यासाठीचे सगळे नियम शाळेत शिक्षकांनी शिकवल्याचे आदित्य ठाकरे यांनी कबुल केले. मात्र सध्या शाळा फक्त इमारत बनत चालली आहे व मैदाने शाळेपासून दुर होत आहेत," अशी खंत ठाकरे यांनी बोलून दाखवली.

पुढे बालताना आदित्य ठाकरे म्हणाले की, संस्कार घराबरोबरच शाळेतून मिळतात. पण आता शिक्षकांनी सॉफ्टवेअर प्रमाणे स्वतःला अपग्रेड केले पाहिजे. कारण देश घडवण्याचे काम शिक्षकांच्या खांद्यावर आहे. तर शिक्षणात जागतिक दर्जाचे बदल करायला हवेत, असे ठाकरे म्हणाले. तरच आपल्या देशातील मुलांचे फोटो वर्षाच्या शेवटी छापल्या जाणाऱ्या टाईम्स मासिकाच्या मुखपृष्ठावर येतील. याबरोबरच शिक्षकांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतूक आदित्य ठाकरे यांनी केले.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, परदेशात शालेय शिक्षण घेत असताना लहान मुले अनेक शोध लावतात. कारण तेथे प्रश्न विचारण्याला वाव असतो. त्यामुळे नव्या शिक्षणपध्दतीत माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारण्याला वाव दिला पाहिजे. पण सध्या शाळेपासून ते देशापर्यंत सगळीकडेच प्रश्न विचारला की गुन्हा ठरतो, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले.

Tags:    

Similar News