बदलापूरच्या रत्नाकर महाराज मठ हल्ला प्रकरणी कॅ. आशिष दामले दोषी
बदलापूर इथल्या इंदगावमधील रत्नाकर महाराज यांच्या साधना मठावर हल्ला केल्याप्रकरणी बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांना जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवल आहे.;
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथल्या इंदगावमधील रत्नाकर महाराज यांच्या साधना मठावर हल्ला केल्याप्रकरणी बदलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कॅप्टन आशिष दामले (वय 35 वर्षे) याला कल्याण च्या जिल्हा व सत्र न्यायालयानं दोषी ठरवलंय. तर १८ जणांची निर्दोष मुक्तता केलीय. तर मठाचं नुकसान केल्याप्रकरणी दामले यांनी एका महिन्याच्या आतच ५ लाख रूपयांची नुकसानभरपाई मठाला देण्याचे आदेशही दिले.
२ जून २०१५ रोजी आशिष दामले आणि त्यांच्या सहका-यांनी बेकायदेशीररित्या जमाव करून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करत घुसखोरी करून हल्ला केल्याच्या गुन्ह्याखाली न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलंय. दामले आणि त्याच्या सोबतच्या गुंडांनी मठातील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. याप्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दामलेवर दरोडय़ाच्या गुन्ह्यासह धमकावणे, घराची तोडफोड करणे, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर फरार असलेल्या दामलेला कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर तो मध्यप्रदेशातील इंदूर, देवासमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहात होता पोलीस सातत्याने त्याच्या मागावर होते. दामले मध्यप्रदेशातील ओरसा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तेथील एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी त्याला अटक केली.
दामले यांनी मठाला ५ लाख रूपयांची नुकसानभरपाई एका महिन्याच्या आत द्यायची आहे. शिवाय १५ हजार रूपयांचं हमीपत्रही न्यायालयात सादर करायचं आहे. येत्या ३ वर्षांच्या काळात न्यायालय आदेश देईल ती शिक्षा कॅ. आशिष दामले यांना भोगावी लागणार आहे. दरम्यान, या काळात सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल, असं कुठलंही कृत्य दामले यांनी करायचं नाही.
मठावर हल्ला केल्याप्रकरणी सरकारकडून विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड यांनी काम पाहिले. कल्याणच्या जिल्हा व सत्र न्यायालयानं दिलेली शिक्षा कमी असल्याने शिक्षेत अजुन वाढ व्हावी, यासाठी मागणी ॲड. फड यांनी न्यायालयाकडे मागणी केली. कॅ. दामले राजकीय पदाधिकारी आहेत, राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगलच वजन असल्याकारनाणे पुन्हा असा प्रकार करण्याची शक्यता असल्याचं ॲड. संगीता फड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. कॅ. दामले हा अमेरिकेतील ओरलॅन्डो येथील परवानाधारी व्यावसायिक पायलट आहे.
ॲड. संगीता फड यांनी न्यायालयाला सांगितले की, ” जून २०१५ मध्ये साधना मठाच्या आवारात वटपौर्णिमे चा कार्यक्रम सुरु होता. महिला अधिक प्रमाणात वडाच्या झाडाच्या पुजेसाठी एकत्र आल्या होत्या. यावेळी मठामध्ये मुख्य नियंत्रक म्हणून नरेश रत्नाकर, ओमकार रत्नाकर, स्मिता पटेल, पल्लवी आदी उपस्थित होते. रात्री साडे दहाच्या दरम्यान विधी-पूजा आटोपल्यानंतर गर्दी कमी झाल्यावर २० जणांचा घोळका मठावर चालून आला. याच जमावाने मठावर दगडफेक केली. मठाच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडले आणि सभागुहात प्रवेश केला.
मुख्य नियंत्रक नरेश रत्नाकार यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात कॅ. दामले व इतर १८ जणांविरुध्द तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कॅ. दामलेंसह १८ जणांना अटक केली होती. ॲड. संगीता फड यांनी आशिष यांच्यासह आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आशिष जमावाचे नेतृत्व करत नव्हता तरी तो जमावात सामील होता. जमावाने केलेल्या प्रत्येक कृतीला त्याला जबाबदार धरता येणार नाही, असं मत न्यायालयाने नोंदविले. आरोपी पक्षांकडून आरोप फेटाळण्याचा प्रयत्न झाला.
याचा आधिक तपास बदलापूर पोलीस ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी केला. नरेश रत्नाकार, त्यांचा मुलगा ओमकार, स्मिता पटेल, सुरज पाटील, नीतेश केणी, मयूर गायकवाड, अनिस शेख, अयुब शेख यांच्या साक्षी या प्रकरणात महत्वाच्या ठरल्या.
हरीश घाडगे, संतोष कदम, संकल्प लेले, वसंत लंघी, योगेश पाटील, उमेश लोखंडे, केतन शेळके, कौशल वर्मा, युवराज गीध, गणेश सोहनी, दीपक लोहिरे, पांडुरंग राठोड, राम लिहे, प्रज्वल तांबे, कुणाल राऊत, अमृत थोरात, धैर्यशील एजागज, हर्षल जाधव या हल्लेखोरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे ॲड. ए. वाय. पत्की यांनी काम पाहिले.