राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार आज पहाटेच सर्व मंदिरे, मस्जिदसह इतर धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. मात्र यासाठी सरकारने ठरवून दिलेले नियम पहिल्याच दिवशी भाजप नेत्यांनी पायी तुडवले असल्याचे पाहायला मिळाले.
राज्यात आजपासून मंदिर सुरू होत असल्याने भाजपकडून राज्यभरात धार्मिक स्थळी महाआरती करत प्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.याचाच भाग म्हणून औरंगाबादच्या गुलमंडीतील संस्थान श्री. सुपारी मारुती मंदिरमध्ये आज भाजप नेत्यांकडून आरती करण्यात आली.मात्र यावेळी शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली.
मंदिरात भाविकांना प्रवेश देताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, तसेच सॅनीटायझर्सचा वापर करण्याचे नियम असताना भाजप नेत्यांना मात्र याचा विसर पडल्याचे दिसून आले. यावेळी कुठलाही सोशल डिस्टन्सिंग नव्हते, तर अनेक नेत्यांनी तोंडाला मास्क सुद्धा लावला नव्हता. तर काहींनी नावालाच मास्क लावले होते. त्यामुळे त्यांच्यावर सामान्य नागरिकांप्रमाणे कारवाई करण्यात येईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस आमदाराने विनामास्क मंदिरात पूजा
कोरोनामुळे गेली आठ महिन्यांपासून जेजुरीचा खंडोबा गड बंद होता. मात्र सरकारच्या घोषणेनंतर मंदिरे भाविकांसाठी देव दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत. आज पहाटे साडेपाच वाजता काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक खंडेरायाची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.मात्र यावेळी आमदार जगताप यांनी विनामास्क मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली. तर याचवेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम सुद्धा पाळण्यात आले नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून पहिल्याच दिवशी शासकीय नियमांना पायी तुडवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.