राज्यात पाऊस संपताच गारठा वाढला ; पुण्यात तापमानाचा पारा 13 अंशावर

Update: 2021-12-06 11:32 GMT

पुणे  : अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि बंगालच्या उपसागरातील 'जवाद' चक्रीवादळामुळे मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे राज्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. महाराष्ट्रावरील पावसाचं सावट दूर झालं असलं तरी पुढील आठवडाभर राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यावरील पावसाचं सावट दूर झालं असलं तरी आता राज्यात उत्तरेकडील थंड हवेचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. पुण्यात देखील पावसानं उघडीप दिल्याने तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच पहाटे वातावरणात धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पहाटे व्यायामाला बाहेर पडणारे नागरिक देखील स्वेटर घालून बाहेर पडत आहेत.




रविवारी महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी म्हणजे 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबई आणि पुण्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. रविवारी मुंबईत 22 अंश सेल्सिअस तर पुण्यात पाषाण याठिकाणी सर्वात कमी 13.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे जिल्ह्यातील हवेली 13.8, एनडीए 14.2, राजगुरुनगर 14.8, शिवाजीनगर 14.7 आणि माळीण येथे 14.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Tags:    

Similar News