पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया 'मिशनमोड'वर पूर्ण करा
अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशनमोडवर पूर्ण करावी. आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.;
अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशनमोडवर पूर्ण करावी. आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. अधिकारी व कर्मचा-यांनी शेतक-यांचे म्हणणे ऐकून व दु:ख जाणून संवेदनशीलतेने ही प्रक्रिया पार पाडावी. एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी गत दोन दिवसांत पुसदा, शिराळा, खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू,देवरा, देवरी, ब्राम्हणवाडा या अतिवृष्टीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर याबाबतची कार्यवाही व प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शेतीनुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्याच्या अचूक नोंदी अहवालाद्वारे घ्याव्यात. यासाठी तालुका कार्यालयांनी वेळोवेळी अपडेट माहिती दिली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना भरपाई मिळण्यासाठी परिपूर्ण अहवाल द्यावेत. मेळघाटातही पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया गतीने राबवावी. नागरिकांना आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना दिल्या