कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा ; NCB पुढील कोठडी मागणार नसल्याची माहिती
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबी रविवारी कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात त्याची पुढील कोठडी मागणार नसल्याची माहिती समोर येत आहे. आर्यन खानची रविवारी मुंबईतील न्यायालयाने एक दिवसासाठी एनसीबीच्या कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आर्यन खानला आज न्यायालयीन कोठडी सुनावली जाईल तेव्हा त्याचे वकील त्याच्या जामिनासाठी अर्ज करणार आहेत. आर्यन खान सह, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि दुसरी आरोपी मुनमुन धामेचा यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रगच्या प्रकरणात कथित सहभागासाठी अटक केली होती. दरम्यान आर्यनला रविवारी दुपारी २ वाजता बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन, विक्री आणि खरेदीमध्ये गुंतल्याबाबत अटक करण्यात आली.
दरम्यान एनसीबीने म्हटले आहे की, "तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीसाठी आज(सोमवारी) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. उर्वरित ५ आरोपी, नुपूर सतिजा, इश्मीत सिंग चड्ढा, मोहक जयस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत चोकेर यांना रविवारी अटक करण्यात आली आहे.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकत पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त केली होती. आणि संशयितांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. 'एनसीबी'ने आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवत संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली आणि एकाला ताब्यात घेण्यात आलं. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.