मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिली होती, त्यामुळे आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर उर्वरित सुनावणी काल पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. पण एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली होती . एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानला जरी जामीन मंजूर झाला असला तरी मात्र, त्याला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. कारण न्यायालयाच्या निकाळाची प्रत प्राप्त झालेली नाही. दरम्यान उद्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतरच आर्यनची सुटका होणार आहे.
युक्तिवादादरम्यान एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खान हा ड्रग्जचा नियमित ग्राहक आहे याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा केला. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाही, मात्र तो या कटाचा एक भाग आहे. अरबाजकडे ड्रग्ज आहेत हे त्याला माहित होते. आर्यन आणि अरबाज एकाच रूममध्ये राहत होते. आर्यन ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता. म्हणून आम्ही कटकारस्थान असल्याचे कलम २८ आणि २९ लावले. त्यामुळे जामीन मिळण्याविषयीच्या कठोर अटींचे कलम ३७ लागू होते. असा युक्तिवाद केला.
मात्र दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर काही अटींसह आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे, देश सोडून जाता येणार नाही, पुराव्यांशी छेडछाड करु नये, पोलीस स्थानकात हजेरी लावावी अशा अटी घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, आजची रात्र त्याला तुरुंगातच घालावी लागणार आहे.