समीर वानखडे अडचणीत : खातेअंतर्गत चौकशी आणि सत्र न्यायालयात धाव

Update: 2021-10-25 07:56 GMT


आर्यन खान ड्रग प्रकरणात काल मोठा खुलासा झाल्यानंतर आता लागोपाठ घटनांना वेग आला आहे. मु्ंबई पोलिस आयुक्तांकडे कारवाईपासून संरक्षणाची मागणी केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन तपासात अडथळे आणणाऱ्या कृत्यांना रोखण्याची मागणी केली आहे. एनसीबीने समीर वानखडेंची खातेअंतर्गत चौकशीची घोषणी केली आहे.

एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी क्रूझवरील ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलासह काहीजणांना एनसीबीने अटकही केली होती. या अटकेनंतर समीर वानखडे हिरो ठरले होते. परंतू त्यानंतर या प्रकरणात अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गुन्हेगार आणि मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर सैल याने प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ जारी करून हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरूख खानकडे २५ कोटी रूपये मागितले होते. पण १८ कोटी रूपयात सौदा पक्का झाला होता असा गौप्यस्फोट केला.

काल दिवसभर याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर समीर वानखडेंनी फिटींग उत्तर देऊ असं सांगितलं होतं. दिवसभर तीनवेळा निरोप देऊनही एनसीबीची पत्रकार परीषद झाली नाही. अखेर उशिरा एनसीबीच्या झोनल कार्यालयातून विभागीय महासंचालक मुथा अशोक जैन यांच्या सहीचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामधे त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून साक्षीदार प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र वाचायला मिळाल्याचे सांगितले. वास्तविक या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु असल्यानं त्यांनी प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करायला हवं होतं. या प्रतिज्ञापत्रातील आरोपांचा विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी इन्कार केला असला तरी प्रतिज्ञापत्रातील काही तपास प्रक्रीयेतील आरोपांबाबत तपासासाठी संबधीत प्रकरण महासंचालक, एनसीबी यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात आले.

रात्री उशिरा समीर वानखडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून संरक्षण देण्याची मागणी केली होती. मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही अज्ञात लोक माझ्यावर कारवाई करू शकतात. असा दावा समीर वानखेडे यांनी पत्रात केला आहे.

आज सकाळीच एनसीबीच्या वतीने समीर वानखडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामधे त्यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैयक्तीक आरोप होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. `` मी आर्यन खान प्रकरणाचा तपास करत असल्यानेच माझ्यावर आणि कुटुंबियावर आरोप करण्यात आले आहेत. त्यातून मला डायव्हर्ट करुन कोर्टात अपयशी ठरेल असे प्रयत्न केले जात आहेत. मी कोणत्याही प्रकारच्या तपासाला तयार आहे. माझी १५ वर्षाची कारकिर्द आहे. माझ्या कामावर परीणाम व्हावा म्हणुनच माझ्यावर वैयक्तीक आरोप होत आहेत.

एनसीबीचे वकिल अद्वैत सेठाना कोर्टात म्हणाले, पंचाचे प्रतिज्ञापत्र समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यामुळे आर्यन खान प्रकरणातील चौकशीला अडथळा निर्माण होईल. तसेच उद्या उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीनावर होणाऱ्या सुनावणीवर देखील प्रभाव पडेल. त्यामुळे प्रभाकर साईल याला साक्षी पुराव्यांमधे फेरफार करण्यापासून रोखण्याचे आदेश द्यावेत. सत्र न्यायालयाने एनसीबीची बाजू ऐकुण घेतली असून निर्णय दुपारपर्यंत राखून ठेवला आहे.

प्रभाकर साईल यांनी प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओ गौप्यस्फोट केल्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर आता समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. व्हिजिलन्स विभागाकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. याचा तपास संबधित विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. समीर वानखेडे करत असलेल्या तपासाबाबतही पुढे निर्णय होणार आहे. या चौकशीसाठी समीर वानखेडे यांना दिल्लीला बोलवले जाणार आहे. तसेच पंच प्रभाकर साईल यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या संपूर्ण चौकशीनंतर याचा अहवाल व्हिजिलन्स विभागाकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर समीर वानखेडेंच्या तपासाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News