दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर आज सीबीआयने टाकलेल्या छाप्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार वर टीका केली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश, अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दिल्लीच्या शिक्षणाच्या मॉडेलचे कौतुक केले. मनीष सिसोदिया यांचा फोटो छापला आहे. ही केवळ दिल्लीसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र केंद्र सरकारने सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या घरी पाठवले. सिसोदिया हे सर्वोत्तम शिक्षणमंत्री आहेत. केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातील इतर मोठ्या देशांच्या वृत्तपत्रांमध्ये भारताचे असे चित्र असायला हवं. असं म्हणत केजरीवाल यांनी केंद्र सरकार वर टीका केली आहे.
या अगोदरही, मनीष सिसोदिया आणि दिल्ली सरकारच्या इतर अनेक मंत्र्यांविरोधात तपास करण्यात आले, परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. सीबीआयला दिल्ली सरकारच्या मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी वरून आदेश आहे.
केजरीवालांचं मिशन मेक इंडिया...
आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वी मेक इंडिया मिशन सुरू केले आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज या संदर्भात 95 1000 1000 हा क्रमांक जारी केला आहे. ज्यांना भारताला जगातील नंबर वन देश होताना पाहायचे. त्यांनी या मिशनमध्ये सहभागी व्हावे आणि या नंबरवर मिस कॉल द्यावा. तुम्ही स्वतः मिस्ड कॉल करा आणि इतर लोकांनाही मिस्ड कॉल करायला सांगा.मेक इंडिया नंबर वन मिशनसोबत आपल्याला 130 कोटी लोकांना जोडायचे आहे.
दरम्यान आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी दिल्लीच्या दारूच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला.
जर दारूचा मुद्दा असेल तर गुजरातमध्ये चौकशी का झाली नाही? भाजपच्या जिल्हा पंचायत समितीच्या सदस्याच्या घरातून बनावट दारू पकडली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा तुरुंगात गेले का?. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या चौकशीत काय समोर आलं? CBI, ED नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला काही करू शकतात का? असा सवाल त्यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठीच असे छापे टाकण्यात आला असल्याचं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.