केंद्र राज्यातील वाद आणखी तीव्र, केजरीवाल घेणार शरद पवार यांची भेट
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदलाचे अधिकार राज्य सरकारला दिले असताना केंद्र सरकारने वटहुकूम जारी केला आहे. त्यामुळे यावरून राजकारण पेटलं असतानाच आता अरविंद केजरीवाल महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
Sharad pawar-Arvind Kejariwal Meeting : केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकूमाच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी बंड पुकारले आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत आहेत. बुधवारी अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर अरविंद केजरीवाल हे शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.
सध्या देशभर विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर केंद्र सरकारने वटहुकूम काढत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अंतिम अधिकार उप राज्यपालांना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याविरोधात केजरीवाल यांनी रान पेटवले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकार हे सर्वोच्च न्यायालय आणि लोकशाही (Democracy) मानत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिल्ली सरकारच्या बाजूने लागलेला असताना त्याविरोधात वटहुकूम काढला आहे. एवढंच नाही तर आगामी अधिवेशनात केंद्र सरकार दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदलासंदर्भातील बील संसदेत मांडणार आहे. या बिलाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली आहे. त्याप्रमाणेच केजरीवाल शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
पंतप्रधान मोदी हे लोकशाहीच्या मार्गचा अवलंब करत नसून हुकूमशाहीचा अवलंब करत आहेत. 2015 मध्ये दिल्ली मध्ये आम आदमी सरकारचे आमदार फोडण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ (Operation Lotus) सारखे प्रयोग राबवले होते. आठ वर्षाच्या न्यायालयीनं लढाई लढल्यानंतर न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. या निकालात अडथळा निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी आठ दिवसात परिपत्रक जारी केलं.
दिल्लीत जे झालं ते संपूर्ण देशाभारत हळूहळू होतांना दिसून येत आहे. म्हणून आम्ही यांच्या विरुद्ध अनेक पक्षांना आमच्या समर्थनात उभे राहण्याचे आवाहन करत आहोत. त्यासाठी महाराष्ट्रतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची केजरीवाल हे भेट घेणार आहेत. यातून विरोधी आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केजरीवाल यांच्याकडून सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळातील दिल्लीशी संबंधित बिलाच्या वेळी शरद पवार केजरीवाल यांना साथ देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.