आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगचे धोके: असिम सरोदे

आपला चेहरा, आपला आवाज, आपल्या भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट लकबींचा वापर करून व्हिडीओ तयार करण्याचं तंत्रज्ञान समोर आलं आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर राजकीय व्यक्तीने केला तर... भारतासारख्या देशात काय होईल? आपल्या देशात हे ओळखण्याचं तंत्रज्ञान आणि हे रोखण्यासाठी कायदा भक्कम आहे का? वाचा घटनातज्ज्ञ असिम सरोदे यांचा लेख;

Update: 2021-06-12 17:40 GMT

डीप फेक टेक्नॉलॉजी फारच भयानक प्रकार आहे. म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, विशिष्ट अल्गोरिदम व मशीन लर्निंगद्वारे कुणाच्याही चेहऱ्यावरील हावभाव, भावना व कशाबद्दल आपण संवेदनशील आहे त्याचे बारकावे, डोळ्यातुन व्यक्त होणाऱ्या इमोशन्स व आवाज कोणत्याही इतर व्यक्तीवर लावला जाऊ शकतो आणि इतरांना वाटेल की ती व्यक्ती आपणच आहोत. अगदी त्वचेचा रंग, चेऱ्यावरील डाग व सुरकुत्या यासह एखाद्या व्यक्तीचे बारकावे जुळविले जातील.

म्हणजे कुणीतरी A काहीतरी बोलेल, करेल आणि नंतर B चा सजीव, हलता व मानवी भावना तशाच नेकपणाने व्यक्त करणारा जिवंत चेहरा आणि आवाज लावला की सगळी कृती आणि म्हणणे B चे आहे असेच वाटेल अशा प्रकारचे काहीतरी येऊ घातलंय असे कळते. खऱ्या माणसांची खोटी चित्रफीत तयार केली जाऊ शकते. याचा मोठा गैरवापर जसा राजकारणात सुरू सुद्धा झाला आहे. त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ (पॉर्न मुव्ही) बनविण्यासाठी याचा वापर होणे अत्यंत धोकादायक ठरणार आहे.

म्हणजेच आता आपला चेहरा, आपला आवाज, आपल्या भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट लकबी यांचा वापर कसाही केला जाऊ शकेल. ही बनवाबनवी त्वरित ओळखणारी यंत्रणा तयार होईपर्यंत भारतात काय काय घडेल. याची कल्पना सुद्धा थरकाप उडवणारी आहे.

तंत्रज्ञानाचा वापर कुणाचा अपमान, बेइज्जती, बदनामी करण्यासाठी करू नये आणि कुणाला करू देऊ नये असे ठरवावे लागेल. येथील राजकारण सुद्धा नासविण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सुद्धा याचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. जे काही आपल्यापर्यंत येईल ते तपासून घेणे, विवेकबुद्धि सतत जागृत ठेवणे आवश्यक आहे.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तंत्रज्ञ लोकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा. सायबर क्राईम हाताळणाऱ्या पोलिसांसमोर तपास करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. फौजदारी कायदा किती नवीन गोष्टींनी युक्त असण्याची गरज आहे आणि कितीतरी उणीवा अजूनही या कायद्यात आहेत. याचीही जाणीव मला वकील म्हणून होतेय. डीपफेक टेक्नॉलॉजीच्या वापरावर कारवाई करणारी वेगळी चौकशी व तपास यंत्रणा भारतात असणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या नैतिक वापराचे व मानवी हक्कांचे गुंतागुंतीचे प्रश्न घेऊन नवीन काळ येतोय आपली विवेकबुद्धी व माणुसकी यांचा कस लागणार आहे.

©️अ‍‍ॅड असीम सरोदे

(लेखक संविधानतज्ञ, मानवीहक्क विश्लेषक वकील आहेत)

Tags:    

Similar News