रिपब्लिक टीव्हीचा मुख्य संपादक अर्णब गोस्वामी याला पोलिसांनी इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटक केली आहे. या संदर्भात समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मॅक्समहाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना...
सुशांतसिंह ची आत्महत्या टीआरपी इश्यू म्हणून 'खेळणाऱ्या' अर्णबला आपलंही नाव एका आत्महत्या प्रकरणात आहे याचं भान राहिलं नव्हतं. एका मराठी व्यावसायिकाची आत्महत्या शिवसेनाला मागच्या सत्ताकाळात दखलपात्र आत्महत्या वाटली नाही, आता राजकीय अपरिहार्यता म्हणून का होईना पण ही कारवाई होतेय. राजकीय कारणांसाठी ती थंड ही केली जाऊ शकते...! भाजपने आज जर अर्णब च्या बाजूने भूमिका घेतली तर त्यांचं 'महाराष्ट्र प्रेम' ही जनतेसमोर येऊन जाईल. अशी प्रतिक्रिया रवींद्र आंबेकर यांनी दिली आहे.
तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्विट करुन महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई प्रेस-पत्रकारितेवर हल्ला असल्याची टीका त्यांनी केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई आणीबाणीसारखी असल्याची टीका देखील जावडेकर यांनी केली असून त्यांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची निंदा मी करतो, असं प्रकाश जावडेकर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
दरम्यान आज सकाळी 4 नोव्हेंबरला ही कारवाई करण्यात आली. अर्णब गोस्वामीला राहत्या घऱातून पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे. ताब्यात घेतल्यानंतर अर्णबला पोलिसांच्या व्हॅनमधून अलीबागला नेण्यात येत आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली आहे. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या पत्रात अर्णब गोस्वामी यांचं नाव होते..
पण अर्णब यांच्या रिपब्लिक टीव्हीने अक्षता नाईक यांचे सर्व आरोप याआधी फेटाळले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होते, मग अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची का नाही? असा सवाल अक्षता नाईक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला होता.
त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
"आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत." असं देशमुख यांनी म्हटलं होतं. दरम्यान अर्णब गोस्वामी ने हे सर्व आरोप फेटाळले होते. तसंच बदनामी प्रकरणी कारवाई करु असा इशारा देखील दिला होता. अर्णब गोस्वामींनी फेटाळले आरोप
"अक्षता नाईक या सत्याला तोडून-मोडून मांडत आहेत. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेडशी (अन्वय नाईक यांची कंपनी) असलेला सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला असून, त्याचे कागदपत्रही आमच्याकडे आहेत," असं अर्णब गोस्वामींच्या टीमने म्हटलं आहे. तसंच, "अक्षता नाईक यांना त्यांनी केलेल्या आरोपांचे कुठलेच पुरावे पोलिसांसमोर सादर करता आले नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले आहे. कुठलेही अवैध कृत्य झाले, याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत. "अक्षता नाईक यांनी सत्या चुकीच्या पद्धतीने मांडल्यास, चुकीचे दावे केल्यास किंवा ARG आऊटलायर मीडियाला लक्ष्य केल्यास बदनामी केल्याप्रकराणी कायदेशीर कारवाई करू," असा इशारा अर्णब ने दिला होता.
काय आहे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण?
कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांनी २०१८ मध्ये अलिबागमधील काविर गावातील त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी अन्वय यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आत्महत्या करत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
दोन वर्षांनंतर , ५ मे रोजी नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी व्हिडिओद्वारे केली. एफआयआर दाखल केल्यानंतर दोन वर्षांत पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. तसंच माझ्या आणि मुलीच्या जीवाला धोका असून, आम्हाला काही झालं तर संबंधित व्यक्ती त्यास जबाबदार असतील, असंही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. याअन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या मागणीची दखल राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेत योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले होते.