रायगड : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाचा खटला गुरूवारपासून नव्याने अलिबाग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायलायत सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी न्यायलायत हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने अर्णब गोस्वामीसह इतर दोन आरोपींनाही दिले होते. मात्र तिघेही हजर झाले नाहीत. त्यामुळे आरोपींविरोधात अटक वॉरंट काढण्याबाबत न्यायालयात अर्ज केला आहे, अशी माहिती सरकारी वकील एड. प्रदीप घरत यांनी दिली आहे. यावर आता ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायदंडाधिकारी सूनयना पिंगळे याच्या न्यायलायत दोषारोपपत्र 4 डिसेंबर रोजी दाखल केले होते. त्यानुसार गुरूवारी न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तिन्ही आरोपी न्यायालयात हजर राहिले नाही.
अर्णब गोस्वामी याच्या वकिलांनी आरोपी हे दिल्ली येथे असून कोरोना नियमामुळे हजर राहू शकत नाहीत, असा युक्तिवाद केला होता आणि तीनही आरोपींना गुरूवारी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी अशी विनवणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने विनवणी मान्य केली. त्यामुळे पुढील सुनावणीमध्ये अर्णब गोस्वामीसह तिन्ही आरोपींविरोधात अटक वॉरंट काढण्याच्या मागणीवर काय निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.