परमबीर सिंह यांचे लेखी आदेश, गुन्हे शाखेतून बदली करण्याअगोदर विचारा, सचिन वाझेकडे का होते मोठ्या प्रकरणांचे तपास...
परमबीर सिंग हे वाझे यांच्यामार्फत खोटे गुन्हे दाखल करुन कोटयावधीची वसुली करीत असल्याच्या तक्रारी आता समोर येत आहे. वाझे यांना पोलिस खात्यात परमबीर यांनीच आणले होते. यानंतर त्यांना मुंबईच्या सीआययू युनीटचा प्रमुख बनविण्यात आले. यासाठी कोणत्या नियमांचा वापर करण्यात आला. हे अद्यापसमोर आलेले नाही.
मात्र, या सर्व प्रकरणामध्ये एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे आत्तापर्यंतचे सर्व महत्त्वाचे तपास हे वाझे यांच्याकडेच दिले होते. शिवाय गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व शाखेंचे वरीष्ठ किंवा प्रभारी पोलीस निरीक्षक यांची नेमणुक किंवा बदली ही पोलिस आयुक्त मुंबई यांच्या पुर्व संमतीने करावी. असे आदेशच २५ जुन २०२० रोजी तत्कालील पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी काढले होते.
परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांची संख्या वाढतेय...
क्रिकेट बुकी सोनू जलान याने परमबीर सिंग यांच्यावर १० कोटीची खंडणी मागीतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता प्रसिध्द कार डिजाअनर दिलीप छाबरीया यांनीही सचिन वाझेच्या माध्यमातुन परमबिर सिंग यांनी २५ कोटी रुपयाची मागणी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातुन केला आहे.
यापुर्वीही परमबीर सिंह यांच्यावर बांधकाम व्यवसायीक केतन तन्ना, मुनीर पठाण, मयुरेश राउत यांच्यासह पोलिस खात्यातील अधिकारी भिमराव घाडगे व अनुप डांगे यांनीही गंभीर आरोप केले आहे. घाडगे यांच्या तक्रारीवरुन परमबीर सिंह यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर अट्रोसीटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या या संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे अनुप डांगे यांनी तर परमबीर सिंह यांचे थेट अंर्डवर्ल्ड सोबत संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
या सर्व आरोपांमुळे परमबीर सिंह हे सचिन वाझे यांना हाताशी धरुन कोटयावधींची वसुली करत होतें हे समोर येत आहे. सचिन वाझे यांना खात्यात घेण्यासापासुन ते त्यांच्याकडे महत्त्वाचे तपास देण्यापर्यंत परमबीर सिंग यांची महत्त्वाची भूमीका राहिलेली आहे.
परमबीर सिंह हे मुंबई पोलिस आयुक्त असतांना त्यांच्या अध्यक्षतेखालच्या समीतीने वाझेला पुन्हा पोलिस दालात घेतले होते. शिवाय दोन दिवसातच त्यांच्याकडे महत्वाच्या अश्या सीआययूची यूनिटची जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी देत असतांना परमबीर सिंह यांनी तेथील प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक घोपरडे व पोलिस निरीक्षक सुधाकर देशमुख यांची गुन्हे प्रकटीकरण शाखेत बदली केली.
सीआययू ते प्रमुख पद हे पोलिस निरीक्षक दर्जाचे आहे. परंतू परमबीर सिंह यांच्या आर्शीवादाने ते सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेल्या सचिन वाझे यांना मिळाले.
२५ जून २०२० ला गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व पोलिस निरीक्षकांची नेमणूक किंवा बदली ही माझ्या पुर्व संमतीशिवाय करुन नये. असे आदेश पोलिस आयुक्त असतांना परमबीर सिंह यांनी काढले. यानंतर परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांच्याकडे ९ जुलै २०२० ते १२ मार्च २०२१ पर्यत अनेक महत्त्वाचे तपास दिले. यात प्रामुख्याने दिलीप छाबरीया यांच्या प्रकरणासह टीआरपी घोटाळा, खंडणी, डिलेज चोरी, बोगस कॉल सेंटर, क्रिकेट बेटींग, हुक्का पार्लर, कॉपी राईट यासह इतर गुन्हांचा सुध्दा समावेश आहे. तसेच या सर्व प्रकरणाच्या तपासाची माहिती वाझे हे थेट परमबीर सिंह यांनाच देत होते.
दरम्यान परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांना 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या आरोपानंतर परमबीर सिंह यांच्या विरोधातच आता आरोपांची संख्या वाढत आहे.