आणखी 380 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त ; एसटी महामंडळाने सेवा समाप्तीचे शस्त्र उपसले
मुंबई : गेल्या 2 आठवड्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. सरकारने वेळोवेळी नोटिसा देऊनही कर्मचारी सेवेत रुजू होण्यास तयार झालेले नाही. अशा परिस्थितीत सरकारनेही कारवाईचा कठोर बडगा उगारत सेवा समाप्तीचे शस्त्र उपसले आहे. मागील काही दिवसांपासून ही कारवाई केली जात असून काल आणखी 380 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा 618 वर पोहोचला आहे. तसेच आज 161 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने संपादरम्यान निलंबित झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2937 झाली आहे.
एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे लालपरीला ब्रेक लागला आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने सेवा समाप्तीचे शस्त्र उगारून संपकर्त्या कर्मचाऱ्यांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या कारवाई अंतर्गत शुक्रवारी 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापाठोपाठ काल आणखी 380 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून महामंडळाने आपली कारवाई तीव्र केली. सरकार आणि आंदोलक एसटी कर्मचारी अशा दोन्ही बाजूंकडून चर्चेदरम्यान तोडगा निघण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे एसटी संपाचा तिढा अजून तरी कायम आहे. दिवाळीपासून राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी सेवा ठप्प आहे. परिणामी राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत.