सोमवारपासून शाळा सुरू होणार का? वर्षा गायकवाड म्हणाल्या असं काही...वाचा
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शाळा सुरू करण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवला आहे.;
ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (ओमिक्रोन) पार्श्वभुमीवर कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शासनाने जारी केलेल्या निर्बंधानंतर 14 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यभरातून या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.
यावेळी शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सध्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल. त्या ठिकाणी जिल्हा परिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतील, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला आहे.
याबरोबरच 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळांमध्ये करून घेता येईल. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पुर्ण करण्याबाबत नव्याने निर्देश जारी केले आहेत.
त्यामुळे राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यात स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कमी रुग्णसंख्या असलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय स्थानिक प्रशासनाने घेण्यात यावेत, असे म्हटले आहे. लवकरच यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू होणार का? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.