गुरे चोरी ते कोरोना लस चोरी: सामना
वेदकाळातील गुरांची चोरी ते आताच्या कलियुगातील कोरोना लसींची चोरी असा हा देशातील चोरी आणि चोरांचा प्रवासावर सामना संपादकीय मधून भाष्य करण्यात आले आहे.;
कलियुगात चोरी करायच्या वस्तूंची 'व्हरायटी' प्रचंड वाढली आहे. त्यात सध्याचे युग कोरोनाचे आहे. तेव्हा चोरी करण्याच्या वस्तूंमध्ये कोरोना लसींचीही भर पडली असेल तर आश्चर्यजनक काहीच नाही. वेदकाळातील गुरांची चोरी ते आताच्या कलियुगातील कोरोना लसींची चोरी असा हा देशातील चोरी आणि चोरांचा प्रवास आहे. चोरीचा हा मामला 'हळूहळू बोंबला' असे म्हणत मागील पानावरून पुढे अखंड सुरू आहे असं सामना संपादकीय मधून सांगण्यात आलं आहे.कोरोनावर 'वेलांटी' नसली तरी निदान लसीची 'मात्रा' आहे आणि चोरीवर 'वेलांटी' असली तरी कोणतीच 'मात्रा' नाही, असे हे सगळे त्रांगडे आहे!
चोरी हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. तथापि, अपवाद वगळता चोरी कोणी जाणीवपूर्वक करीत नाही, हादेखील एक सर्वमान्य सिद्धांत आहे. आपल्या अनेक मसालेदार हिंदी चित्रपटांमधील हीरो लहानपणी 'पापी पेट का सवाल है' म्हणत 'रोटी'ची चोरी करीत मोठेपणी 'डॉन' बनलेले दाखविले गेले आहेत. यावर उदात्तीकरणाचे आक्षेप घेतले गेले असले तरी चोरी कशाची करायची हे चोराची गरज आणि इच्छा यावरच अवलंबून असते, हे कसे अमान्य करता येईल? म्हणजे कोणी भाकरीच्या तुकड्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी चोरी करतो तर कोणी चैन पूर्ण करण्यासाठी मौल्यवान चीजवस्तूंवर डल्ला मारतो. चोर आणि चोरी यांची 'व्हरायटी' अशी अनंत आणि अथांग आहे. मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणारी आहे. या शेपटाला आता आणखी एक धक्कादायक गोष्ट चिकटली आहे ती म्हणजे कोरोना लस. हैदराबादमधील जामबाग प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना लसींचे तब्बल 600 डोस चोरटय़ांनी लांबविल्याचे समोर आले आहे.
फक्त लसीच नाही, तर तेथील दोन संगणक आणि इतर सामान यावरही चोरटय़ांनी हात मारला आहे. या लसींची साठवणूक 'डोअर टू डोअर' लसीकरण अभियानासाठी करण्यात आली होती, पण त्याआधीच चोरटय़ांनी त्यांचे 'ओपन दी डोअर' केले आणि पोबारा केला. आता या प्रकरणात पोलीस तक्रार झाली आहे आणि नेहमीप्रमाणे तपास सुरू आहे. या तपासात चोर आणि मुद्देमाल हस्तगत होईलही, पण कोरोना लसींची चोरी कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे का? 'गरज ही शोधाची जननी असते', असे म्हटले जाते. त्यानुसार 'गरज ही चोरीला प्रवृत्त करते' असेही म्हणता येईल. मात्र आता कोरोना लसीकरणाने देशभरात दीडशे कोटींचा टप्पा पार केल्याचे ढोल पिटले जात असताना आणि लसींची पुरेशी उपलब्धता असताना एक-दोन नाही तर 600 डोस चोरण्याची 'गरज' कशामुळे भासली? गेल्या वर्षीही कोरोना लसींच्या चोरीचे प्रकार घडले होते, पण ते किरकोळ होते. नगर, जळगाव, अकोला जिल्हय़ांत कोरोना लसीच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या.
नगर जिल्हय़ातील आरोग्य कर्मचारी हा तर जगातील पहिला 'लसचोर' ठरला होता. मात्र त्यावेळी कोरोनाची भयंकर दहशत होती आणि लसींचाही तुटवडा होता. त्यामुळे 'कसेही करून लस हवीच' या मानसिकतेतून हे सगळे चौर्यकर्म घडले असावे. तथापि आता हैदराबादमधील लसचोरीची 'गरज' कोणाची आणि ही 'हाथ की सफाई' करण्यामागील 'प्रेरणा' काय? हा प्रश्न उरतोच. चोरी हा गुन्हा आणि अनैतिक बाब असली तरी त्याचे दाखले अगदी ऋग्वेद काळापासून मिळतात.
ऋग्वेदात तस्कर, स्तेन असे शब्द आढळतात आणि त्या काळी गुरे पळविणे हा चोरीचा मुख्य प्रकार होता. त्यावेळी शेती आणि पशुपालन हाच प्रमुख व्यवसाय होता. त्यातूनच 'गुरे' ही 'गरज' बनली असावी आणि त्या प्रेरणेतून गुरांच्या चोऱया होत असाव्यात. अथर्ववेदातही लांडगे, वाघ आणि चोर यांच्यापासून संरक्षण करण्यासंदर्भातील 'ऋचा' आहेत. प्राचीन रोमन, ग्रीक काळातही चोरी, चोरीच्या गोष्टी, त्यासाठी होणाऱया शिक्षा याविषयी रंजक माहिती सापडते. वेदकाळात गुरे ही चोरीची 'वस्तू' आणि 'गरज' होती. आताच्या कलियुगात चोरी करायच्या वस्तूंची 'व्हरायटी' प्रचंड वाढली आहे. त्यात सध्याचे युग कोरोनाचे आहे. कोरोनाच्या नवनवीन अवतारांचे आणि त्यावर निघणाऱया लसींचे आहे. तेव्हा चोरी करण्याच्या वस्तूंमध्ये कोरोना लसींचीही भर पडली असेल तर आश्चर्यजनक काहीच नाही. कोरोनाचे शेपूट ठेचण्यासाठी माणसाने लसींची 'मात्रा' शोधली. ती नक्कीच प्रभावी ठरली, पण तरीही कोरोना, डेल्टा, ओमायक्रोन, फ्लोरोना असे हे शेपूट वळवळतेच आहे. वेदकाळातील गुरांची चोरी ते आताच्या कलियुगातील कोरोना लसींची चोरी असा हा आपल्या देशातील चोरी आणि चोरांचा प्रवास आहे, असं सामना संपादकीय मधून शेवटी सांगण्यात आले आहे.