अनिल देशमुख यांच्या मुलाने घेतली नितीन गडकरी यांची भेट, भेटीचं कारण काय?
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांच्या उपस्थित भेट झाल्याने चर्चेला उधाण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. विशेष बाब म्हणजे या भेटी दरम्यान अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख देखील उपस्थित होता. विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
सलील देशमुख यांचे वडील अनिल देशमुख हे सध्या १०० कोटींच्या लाच प्रकरणात अटकेत असून त्यासंदर्भात ही भेट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ॲन्टीलिया केस मध्ये सचिन वाझेचा समावेश असल्याकारणाने अनिल देशमुख यांनी तत्कालीन मुंबई चे महासंचालक परमबीर सिंह यांची बदली केली होती. या बदलीनंतर परमवीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी वसुली करण्याचा आरोप केला होता.
या प्रकरणांमध्ये अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. सध्या याच प्रकरणात देशमुख अटकेत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सलील देशमुख यांनी विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत गडकरी यांच्या भेटीला जाणं हा निव्वळ योगायोग नसल्याचं जाणकारांच मत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी या भेटी संदर्भात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत, राज्यातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा म्हणून नितीन गडकरींकडे मागणी केली. विकास कामात कुठे राजकारण येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन चर्चा केली, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.