अनिल देशमुख परत येतील, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू: शरद पवार

अनिल देशमुख परत येतील, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू: शरद पवार Anil deshamukh will come back Sharad pawar on Anil deshamukh Troubles Situation;

Update: 2021-11-17 17:30 GMT

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यावेळी संबोधित करताना शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची उणीव जाणवली. यावेळी त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आजचा असा पहिला दिवस आहे की, नागपूरमध्ये आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख इथे नाहीत. हे आत्तापर्यंत घडलं नव्हतं. असं म्हणत शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची उणीव बोलून दाखवली.

सध्या अनिल देशमुख अटकेत असून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाऱाचे आरोप केले आहेत. मात्र, ज्या परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. तेच गेले अनेक दिवसांपासून गायब आहेत. त्यामुळं त्यांना आज न्यायालयाने फरार घोषित केले आहे. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आज शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या बाबत बोलताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले...

गेली अनेक वर्षे आपण एकत्रितपणे काम करतो. नागपूर जिल्हा, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या सगळ्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनाला आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे अनिल देशमुख यांनी सांभाळली.

आताचे केंद्र सरकार हे एखाद्या राज्यात सत्ता मिळाली नाही तर सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार उभे करण्यात आपल्याला यश मिळाले.

या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा सहभाग आहे.राज्याला स्थिर कारभार देऊन प्रगतीच्या मार्गाकडे न्यायचा निर्णय आम्ही घेतला. पण काही लोकांना हे पटत नाही. काहींच्या हातून सत्ता गेल्याने त्यांच्यात एक अस्वस्थता निर्माण झाली.

यातूनच दिल्लीच्या मदतीने इथलं राज्य कसं घालवता येईल यासाठी अखंड प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. त्याची सुरुवात म्हणून सरकारमधील नेत्यांचा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांचा वापर करून एकप्रकारे छळवाद करण्याचे काम सुरू आहे.

दोषारोप होताच अनिल देशमुख माझ्याकडे आले आणि दोष लागल्यामुळे मी सत्तेत बसणार नाही. हा निर्णय घेतला आणि त्यांनी राजीनामा दिला. हे कशामुळे घडले तर एका माजी आयुक्तांमुळे घडले. आता हे आयुक्त आहेत कुठे? तुम्हाला तोंड दाखवायची ज्यांची तयारी नाही असे अधिकारी बाहेर आहेत आणि अनिलबाबू आत आहेत.

काही अस्वस्थ लोक याद्या तयार करून दिल्लीला पाठवतात आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेतृत्व केले. त्यांनी पक्ष बदलल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ईडीने चौकशीसाठी बोलावले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत काही करता येत नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला चौकशीस बोलावले. अजित पवार त्यांच्याबद्दल काही करता येत नाही तर त्यांच्या बहिणींच्या घरी धाडीसाठी लोक पाठवले.

पाच-पाच दिवस तपास झाल्यावर, त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की दिल्लीवरून आदेश आहेत. बातमी यायला हवी आणि बदनामी व्हायला हवी ही अपेक्षा आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी चौकशी करतात, छापे मारतात तरीही काही निघत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत.

राज्यातील सरकार आपल्या हातून गेलं म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे. हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही.

देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे.. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने.. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र, ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्ता गेल्यावर असं घडतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लहान-थोर कार्यकर्ता त्याचा विचार कधीच सोडणार नाही आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे.

आज तेल, घासलेट, पेट्रोल, गॅसच्या किंमती प्रचंड वाढल्यात. गरीब आणि सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टींचा आदर करण्याची भूमिका या केंद्र सरकारची नाही. त्यामुळेच लोकांना यातना कशा दिल्या जातील ही भूमिका ते घेत असतात.

उत्तर प्रदेश येथील लखीमपुर खीरी येथे जाऊन आलो. तब्बल एक वर्ष होऊनही तिथला शेतकरी लढा देतोय. मात्र जो देशाच्या भूकेचा प्रश्न सोडवतो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीतील सरकारला वेळ नाही.

तिथे ७०-८० वर्षांचा शेतकरी आंदोलनाला बसतो. आया-बहिणी तिथे सगळ्यांचे जेवण करतात. तीच गोष्ट हरियाणा, राजस्थान, उ.प्रदेश याठिकाणी आहे. शेतकरी, कामगार, सामान्य माणूस या सगळ्यांच्या यातना केंद्राची सरकार वाढवत आहे. अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम आता करायला हवे.

इथे येताना अनिल देशमुख सोबत नसल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवायचा ही चिंता मला होती. मात्र, आल्यापासून हेच पाहतो आहे की, सत्तेचा कितीही वापर केला तरी आमचा कार्यकर्ता घाबरणारा नाही. पक्षाच्या मागे हा कार्यकर्ता तितक्याच मजबुतीने आणि ताकदीने उभा राहतो आहे याची प्रचिती मला आली.

इथले अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी संघटना बळकट करण्याची गरज आहे. नागपूर जिल्हा किंवा ग्रामीण भागातील आपल्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी शक्ती उभी करून,. प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली याभागात एक वेगळे चित्र उभे करण्याचे काम तुम्ही करत आहात.

नागपूरमध्ये तुमच्या सामुदायिक ताकदीतून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्यानंतर, सबंध विदर्भाचे चित्र बदलण्याची प्रक्रिया नागपूरमधून होईल. याची मला खात्री आहे. तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्व तुमच्यासोबत अखंड आहोत, हा शब्द यानिमित्ताने देतो.

असं आश्वासन पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिलं आहे.

Tags:    

Similar News