थकवा जाणवू लागल्याने केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना आज तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राणे यांची प्रकृती आता स्थिर आहे, असे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले.
७० वर्षे वय असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महिन्यातून एक वेळा रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयामध्ये येत असतात. नेहमीप्रमाणे ते आजही वैद्यकीय तपासणीसाठी लीलावतीमध्ये आले होते. मात्र, आज लीलावतीमध्ये येत असताना त्यांना थोडासा त्रास जाणवत होता. नेहमीप्रमाणे त्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता डॉक्टरांना वाटली. डॉ. जलील पारकर यांच्या सल्ल्यानंतर आज त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान ब्लॉकेजेस हटवण्यासाठी दोन स्टेन बसविण्यात आले आहेत. त्यांची तब्येत पाहून येत्या दोन-तीन दिवसांत राणे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. राणे यांना विश्रांतीसाठी दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.