डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना ताजी असताना कल्याणमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची चीड आणणारी घटना समोर आली आहे.
याबाबत पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली आहे.
कल्याणच्या एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारी आठ वर्षीय पीडित चिमुकली याच भागातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जायची. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेली असल्याने शिक्षिकेचा पती शिक्षक मुदर तालवाला हा या मुलीची शिकवणी घेत होता. दरम्यान पीडित चिमुकली शिकवणीला जायला तयार नव्हती. शिकवणीला जाण्यास सांगितल्या ती रडायला सुरुवात करायची.यावरून आईला संशय आला. आईने या चिमुकलीला विश्वासात घेऊन विचारले असता मुलीने घडलेला प्रकार हावभाव करुन दाखविला. त्यानंतर आईच्या संपूर्ण प्रकार लक्षात आला, त्यानंतर पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चौकशी सुरु केली. आणि या प्रकरणी 42 वर्षीय शिक्षक मुदर तालवाला याला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपी शिक्षकाला न्यायालयात हजर केले त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली. दरम्यान, शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या शिक्षकाला कठोरतील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.