मराठवाडा नामांतर लढ्यात सक्रिय सहभाग असलेले, आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा माजी परिवहन राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे शनिवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी औरंगाबादमधील एशियन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या पँथर शांत झाला आहे.
रविवारी दि. ५ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत गंगाधर गाडे यांचे पार्थिव उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या मैदानात ठेवण्यात येणार आहे. व त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गंगाधर गाडे यांची राजकीय कारकिर्द
गंगाधर गाडे हे राज्य सरकारमध्ये परिवहन राज्यमंत्री होते. तसेच पँथर चळवळीत लोकप्रिय बौध्द नेते होते. गाडे यांनी दि. ७ जुलै १९७७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाल देण्यात यावं अशी सर्वात आधी मागणी केली होती. त्यानंतर हा नामांतराचा लढा तब्बल १७ वर्षे चालला. अखेर १९९४ ला मराठवाडा विद्यापीठाचे नामविस्तार होऊन विद्यापीठाला "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असं नाव देण्यात आले. गाडे यांनी हा लढा आपल्या सहकार्यांसोबत शेवटपर्यंत लढला होता.
गंगाधर गाडे यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळी गावात १९39 मध्ये झाला. पेशाने ते वकील होते. १९७२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर ते राज्याचे मंत्री देखील राहिले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळपास ४७ दलित वसाहती त्यांनी वसवल्या. गाडे हे एक प्रभावशाली नेते होते. त्यांनी आपल्या आयुष्यात दलितांच्या न्याय हक्कासाठी अनेक लढे दिले. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातही त्यांची भूमिका अग्रेसर होती.
५ वर्षांपासून अल्झायमरचा होता त्रास
गंगाधर गाडे यांना मागच्या ५ वर्षांपासून अल्झायमरचा त्रास होत असल्यामुळे ते सतत त्रस्त असायचे. शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. नियमित तपासणी आणि उपचारासाठी त्यांना शुक्रवारी शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, सून, व नातवंडे असा परिवार आहे. पक्षाच्या कार्यालयात अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्शिव ठेवण्यात येणार असून रविवारी सायंकाळी आनंदवन परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.