बारवाल्यांकडील खंडणीची गोष्ट...

Update: 2021-04-15 09:58 GMT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बारवाल्यांकडून 100 कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचं प्रकरण ताज आहे. मात्र खरंच बार वाल्याकडून असे पैसे गोळा केले जातात का? ज़र केले जातात तर याच्या बातम्या का बाहेर येत नाही. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर नारकर यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे… नक्की वाचा…विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांचं साटंलोटं


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बारवाल्यांकडून 100 कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचे प्रकरण बरेच गाजते आहे. सीबीआयच्या चौकशीत याची सत्यासत्यता उघड होईल, अशी अपेक्षा आहे.

पण, बारवाल्यांकडून कसे पैसे गोळा केले जातात, याची एक बातमी मी (प्रभाकर नारकर) आणि पत्रकार संदीप प्रधान यांनी म्हणजे मी महाराष्ट्र टाइम्समध्ये आणि संदीप प्रधानांनी लोकसत्तात दिली होती.

एका माथाडी नेत्याने त्याची माहिती मला दिली होती. काँग्रेसकडून पहिल्यांदाच मंत्री (गृहराज्यमंत्री) झालेल्या एका मंत्र्याच्या पंटरांनी दादरमधील एका बारवाल्याकडून तीन लाख रुपये खंडणी वसूल केली होती. वर फुकट खाऊ-पिऊ दिले नाही म्हणून मारहाण आणि मोडतोडही केली होती. त्याचप्रमाणे मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातून अशाच पद्धतीने जवळपास आठ कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

बातमी खमंग होती, पण पुरावा काहीच नव्हता. त्यामुळे मी संबंधित माथाडी नेत्याला काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षांकडे तक्रार करायला सांगितले. ही तक्रार हाच बातमीचा आधार झाला होता. तरीही एकट्यानेच बातमी केली, तर अंगाशी येईल या भीतीने संदीपशी बोललो होतो. त्यानेही बातमी लावायची तयारी दाखवली आणि आम्ही बातमी लावली. लोकसत्तात तर पहिल्या पानावरच बातमी होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी चांगलीच खळबळ उडाली.

विधिमंडळाचे अधिवेशनही सुरू होते वा होणार होते. त्यामुळे विधिमंडळात बोंबाबोंब होईल, अशी अपेक्षा आम्हाला वाटत होती. त्यामुळे हे प्रकरण पुढे न्यायचे, असे ठरवून आम्ही मंत्रालयात गेलो. आधी संबंधित राज्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांनी आमच्या समोरच त्यांच्या पंटरांना आई-बहिणीवरून शिव्या हासडल्या. त्यामुळे बातमीवर आपोआपच शिक्कामोर्तब झाले. आता हे प्रकरण विधिमंडळात यावे म्हणून तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांना भेटायला गेलो. त्यांना हा विषय सांगताच, ते म्हणाले तरीच भ... सकाळपासून फोन करीत होता. मला ऐकू येत नव्हते म्हणून लँडलाईन वर फोन करायला सांगितले. आता भेटायला येणार म्हणालाय!

त्यावेळी मी एक चूक केली, बोलताना आठ कोटी जमा केल्याची गोष्ट उघड केली. त्यामुळे त्यांचे काय म्हणता म्हणून चमकलेले डोळे मला धास्तावून गेले. आता काही घडणार नाही, अशी शंका मनात चमकून गेली.

तरीही आमच्या समोर त्यांनी आपल्या पीएला बोलावले आणि अक्कलकोट वरून संबंधित मंत्र्याची सगळी माहिती काढायला सांगितले. या सांगण्यामुळे मला आणि संदीपला काही ना काही घडेल अशी आशा वाटत होती. दोन तीन दिवसानंतर मी विरोधी पक्ष नेत्याच्या त्या पीएला भेटलो. तो म्हणाला फारच गंभीर प्रकरण आहे, संबंधित मंत्राच्या वडिलांच्या नावावर खुनाचे अनेक गुन्हे होते. त्यामुळे आता हे प्रकरण गाजणार आणि मंत्र्याला घरी बसावे लागणार, अशी आशा मला वाटली. 

 दरम्यान संबंधित मंत्री विरोधी पक्ष नेत्यांना भेटून गेल्याचेही कळले होते. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकत होती आणि तसेच घडले! बहुदा या विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी एक नळ बसला होता. हे प्रकरण पुढे वाढलेच नाही आणि बातमी तिथेच संपली!

Tags:    

Similar News