सर्वपक्षीय पॅनेलच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना काँग्रेसचा सुरुंग, चर्चा फिस्कटली
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीत चर्चा फिस्कटल्याने आता इथली निवडणूक रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने शनिवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे कोणत्याही निर्णयाविना बैठक आटोपती घ्यावी लागली आहे, काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी मिळून लढवण्याची भूमिका मांडली आहे.
रविवारी यासंदर्भात पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन हे माध्यमांशी न बोलताच बाहेर पडल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. या बैठकीत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, बैठकीत फक्त चहापान आणि नाश्ता झाल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल करुन निवडणूक बिनविरोध करण्याचा शिवसेना आणि भाजपचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर सर्वपक्षीय पॅनेलवर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणाही करण्यात आली होती. पण आता काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्याने यंदाची जिल्हा बँक निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.