अल कायदाकडून देशात आत्मघाती हल्ल्यांची धमकी
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार पडसाद उमटत आहेत. त्यातच आता अल कायदा या दहशतवादी संघटनेकडून देशात आत्मघाती हल्ल्यांची धमकी दिली आहे.
नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून जगभरातील मुस्लिम देशांनी संताप व्यक्त केला. तर भारताने माफी मागावी, असे मत कतारने व्यक्त केले आहे. त्यापार्श्वभुमीवर दहशतवादी संघटना अल कायदाने भारतात आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिला आहे.
अल कायदा इन द सबकॉन्टिनंट या दहशतवादी संघटनेने गुजरात, उत्तरप्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. तर त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासाठी आम्ही स्वतःला उडवून देण्यासाठी तयार आहोत.
अल कायदा या दहशतवादी संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, गुजरात, उत्तरप्रदेश, मुंबई आणि दिल्लीतील लोकांनी हल्ल्यासाठी तयार रहावे. कारण त्यांना ना त्यांच्या घरात आश्रय मिळणार ना त्यांच्या लष्करी छावण्यांमध्ये, असा इशारा दिला आहे. तर त्यामध्ये त्यांनी भारतीयांचा उल्लेख भगवे दहशतवादी असा केला आहे.
जे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करतात. त्यांना ठार मारलं पाहिजे. तसेच जे आपल्या प्रेषितांबद्दल बोलतात त्यांना संपवण्यासाठी आम्ही आमच्या मुलांच्या अंगावरही स्फोटकं बांधून हल्ला केला पाहिजे. ज्यांनी प्रेषितांविषयी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. त्यांना कोणतीही सुरक्षा वाचवू शकणार नाही. हे प्रकरण निषेध आणि दुःखाच्या शब्दांनी शांत होणार नसल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
अल कायदाने भाजपचा उल्लेख भारतावर ताबा मिळवलेले हिंदू दहशतवादी असा केला आहे. तसेच प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या सन्मानासाठी या युध्दात सहभागी होण्याचे आवाहन या दहशतवादी संघटनेने केले आहे. मात्र भाजपने नुपुर शर्मा यांना पक्षाच्या धोरणाविरोधात वक्तव्य केल्याचे सांगत सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी नुपुर शर्मा यांना सुरक्षा पुरवली आहे.