मुंबई – अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या आधीच त्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदार मिळून एकूण ४० जणांच्या या याचिकेवर स्वाक्षऱ्या आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारण्याच्या आधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. मात्र, आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसवरच अजित पवार यांनी याचिकेद्वारे दावा केल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे त्यांनी ३० जूनलाच याचिका दाखल केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदार-खासदारांनी मिळून केलेल्या ठरावामध्ये अजित पवारांचा दावा योग्य असल्याचं म्हटलंय. पुरावा म्हणून हा ठरावही याचिकेसोबत जोडण्यात आलाय. अशा परिस्थितीत हा ठराव शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. अशा परिस्थितीतच अजित पवार यांनी आज वांद्रे पश्चिम इथं आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला विधानसभेचे 32 आमदार उपस्थित होते. या सर्व आमदारांना एका बसमध्ये बसवून गुप्त ठिकाणी एकत्र ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.