राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. या पाचही स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसार पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून सोमवारपासून हे निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.
दरम्यान कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण क्षेत्रात मात्र यापुर्वीचेच निर्बंध कायम राहणार आहेत.
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.