अजित पवार गटाच्या कृतीने राष्ट्रवादीतील फूट अधिकृतरित्या स्पष्ट

Update: 2023-07-04 04:18 GMT

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी आपली नवी लढाई सुरू झाल्याचे म्हटले. मात्र शरद पवार हेच आपले नेते आहेत आणि राष्ट्रवादीत कुठलीही फूट पडली नसून आम्हीच राष्ट्रवादी आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता अजित पवार गटाच्या एका कृतीमुळे राष्ट्रवादीतील फूट पहिल्यांदाच अधिकृतरित्या समोर आली आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जयंत पाटील यांची हकालपट्टी केली. त्यातच सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. यावेळी अजित पवार यांनी पक्ष आपल्या सोबत असल्याचा दावा केला. दुसरीकडे कराड येथून शरद पवार यांनी नवी लढाई सुरु झाल्याचे म्हटले. या सगळ्या घडामोडी उघड़पणे घडत असल्या तरी अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे नाकारले होते. मात्र आता अजित पवार गट जुन्या प्रदेश कार्यालयात न जाता नव्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन करणार आहे. त्यामुळे सातत्याने पक्ष फुटला नसल्याचे सांगत असले तरी आता पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या उद्घाटनाने राष्ट्रवादीतील फूट स्पष्ट झाली आहे.

एकाच दिवशी राष्ट्रवादीच्या दोन बैठका

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. दुसरीकड़े अजित पवार यांनी पक्षाच्या नवी कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी अजित पवार यांनी 5 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची MET कॉलेज येथे बैठक बोलावली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनीही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाच्या आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याचे स्पष्ट आहे.

Tags:    

Similar News